सूर्योदय ते सूर्यास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:07 AM2021-04-30T04:07:20+5:302021-04-30T04:07:20+5:30
जनआंदोलनांची संघर्ष समितीचे उपोषण करण्याचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा पोट भरायला शहरात आलेल्या ...
जनआंदोलनांची संघर्ष समितीचे उपोषण करण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा पोट भरायला शहरात आलेल्या मजुरांना आतादेखील गावाची वाट धरावी लागत आहे. गावात आईवडील, पत्नी, मुले डोळ्यात प्राण आणून वाट पहात आहेत. १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आहे आणि महाराष्ट्र दिनपण आहे. त्या दिवशी खालील भूमिका समाजासमोर व सरकारसमोर लावून धरण्यासाठी, श्रमिकांच्या, शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानासाठी आपण आपापल्या जागी सूर्योदय ते सूर्यास्त या काळात उपोषण करावे, असे आवाहन जनआंदोलनांची संघर्ष समितीने केले आहे.
जनआंदोलनांची संघर्ष समितीचे नेते विश्वास उटगी म्हणाले की, १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आहे आणि महाराष्ट्र दिनपण आहे. त्या दिवशी खालील भूमिका समाजासमोर व सरकारसमोर लावून धरण्यासाठी, श्रमिकांच्या, शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानासाठी आपण आपापल्या जागी सूर्योदय ते सूर्यास्त या काळात उपोषण करण्यात येणार आहे. राज्य सरकारने तातडीने राज्यातील बहुसंख्य खासगी रुग्णालये ताब्यात घेतली पाहिजेत, त्यासोबत सरकारी आरोग्यसेवेत अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करून राज्यभरात कोविड रुग्णासाठी आवश्यकतेनुसार बेडची उपलब्धता करून दिली पाहिजे. त्याचबरोबर ऑक्सिजन आणि इतर जीवरक्षक औषधांचा पुरेसा साठा सर्वत्र उपलब्ध करणे, जास्तीत जास्त कोविड चाचण्या, गृहविलगीकरण या बाबींवर साथ आटोक्यात आणण्यासाठी त्वरित काम होण्याची आवश्यकता आहे. सर्व जनतेसाठी कोविडची लस मोफत आणि लवकर उपलब्ध केली पाहिजे. उपासमारीवर मात करण्यासाठी गरज असलेल्या सर्वांना कार्ड नसले तरी मोफत धान्य, डाळ, तेल, साखर व केरोसीन मिळाले पाहिजे. राज्यांतर्गत स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी परत नेण्याची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी. लॉकडाऊनमध्ये ज्या मजुरांना रोजगार बंद ठेवावा लागला त्या सर्वांना त्यांचे थकीत वेतन व देय वेतनमालकांकडून मिळण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर यंत्रणा कार्यरत करण्यात यावी.
अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार द्यावे व पन्नास लाखांच्या विम्याचे संरक्षण पूर्ववत देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.