Join us

सासूच्या निधनाच्या धक्क्याने सुनेचा मृत्यू

By admin | Published: December 31, 2016 3:34 AM

सासू-सुनेचे नाते म्हटले की त्यांच्यातील खटके आणि होणारी तू तू मैं मैं सर्वश्रुत आहे. पण भायखळ्यात मात्र सासू-सुनेच्या जगावेगळ्या प्रेमळ नात्याने सर्वांनाच सुन्न

- मनीषा म्हात्रे, मुंबईसासू-सुनेचे नाते म्हटले की त्यांच्यातील खटके आणि होणारी तू तू मैं मैं सर्वश्रुत आहे. पण भायखळ्यात मात्र सासू-सुनेच्या जगावेगळ्या प्रेमळ नात्याने सर्वांनाच सुन्न करून सोडले. ४० वर्षे सासूसोबत एकत्र राहणाऱ्या सुनेला सासूच्या निधनाने धक्का बसला. सासूच्या निधनाच्या अवघ्या तासाभरात हृदयविकाराच्या झटक्याने सुनेचाही मृत्यू झाल्याची घटना भायखळ्यात घडली. कुंभारवाडा परिसरात राहणारे वेस्वीकर कुटुंब. इंदूबाई काशिनाथ वेस्वीकर ८५ वर्षांच्या तर सून प्रतिमा प्रदीप वेस्वीकर या ५२ वर्षांच्या होत्या. ४० वर्षांपूर्वी प्रतिमा या लग्न करून वेस्वीकर कुटुंबीयांच्या सून म्हणून घरी आल्या. त्यांना दोन मुले असून दोघेही विवाहित आहेत. सुरुवातीपासून सासूकडून मिळणाऱ्या आईच्या मायेमुळे त्या एकमेकींच्या मैत्रिणी बनल्या. दोघांमध्ये खटके उडायचे. मात्र काही वेळाने त्या पुन्हा एकत्र येत होत्या. सासू-सुनेच्या या प्रेमाबाबत सोसायटीतही कौतुक होत असे. अनेक जणी त्या दोघींची उदाहरणेही देत. गेल्या काही दिवसांपासून इंदूबाई आजारी होत्या. त्या लवकरात लवकर व्यवस्थित व्हाव्यात यासाठी प्रतिमा यांनी त्यांची काळजी घेतली. जे शक्य होईल ते केले. मात्र उपचारादरम्यान बुधवारी रात्री ९ च्या सुमारास त्यांनी घरीच प्राण सोडले. या धक्क्याने प्रतिमाही पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या. ‘मला एकटी सोडून का गेली, मी कशी राहू...’ असे बोलून त्यांच्या अश्रूंचा हंबरडा सुरू होता. यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रात्री दहाच्या ठोक्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. जे.जे. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेने वेस्वीकर कुटुंबीयांवर जणू दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताने अनेकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. आई नेहमी म्हणायची, मी दादीला एकटी सोडून कधीच जाणार नाही. आम्ही नेहमी सोबतच जाऊ आणि तसेच झाले, असे प्रतिमा यांचा मुलगा चेतन याने लोकमतला सांगितले. सासू-सुनेमधील वादाचा आवाज पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. माध्यमांमध्येही दोघांमधील क्रूरतेला वाचा फोडण्यात आली. मात्र वेस्वीकर या सासू-सुनेच्या कहाणीने सर्वांसमोर एक नवा आदर्श उभा ठेवला आहे.