वर्षातील पहिला सुपरमून; चंद्र दिसणार १० टक्के मोठा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अवकाशात मंगळवार, २७ एप्रिल रोजी विलोभनीय घटना पहायला मिळणार आहे. चैत्र पौर्णिमेची ही सुपरमून पौर्णिमा असून वर्षातील पहिला सुपरमून असेल. या वेळेस चंद्र १० टक्के मोठा आणि ३० टक्के तेजस्वी दिसेल. सुपरमूनचे वैशिष्ट्य म्हणजे पौर्णिमा २७ तारखेला असली तरी २६ ते २८ असे ३ दिवस चंद्र जवळजवळ पूर्ण दिसेल. चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर ३,५८,६१५ किमी असेल, अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाॅच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
प्रत्येक वर्षी सुपरमूनच्या वेळेस चंद्र व पृथ्वीमधील अंतर कमी, अधिक होत असते. हे कमीतकमी अंतर ३,५६,५०० किमी तर दूरचे अंतर ४,०६,७०० किमी असते. या वर्षीचे पृथ्वी व चंद्रामधील सर्वाधिक कमी अंतर २६ मे २०२१ रोजी होणाऱ्या सुपरमून वेळी असेल. २६ जानेवारी १८४८ रोजी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ आला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०१६ ला ताे पृथ्वीच्या खूप जवळ आला. २७ एप्रिल आणि २६ मे रोजी होणारे सुपरमून हेही खूप कमी अंतराचे असतील. परंतु पृथ्वी आणि चंद्रामध्ये सर्वाधिक कमी अंतर हे २५ नोव्हेंबर २०३५ रोजी असेल, तर ६ डिसेंबर २०५२ रोजी शतकातील सर्वात मोठा सुपरमून पहायला मिळेल. २७ एप्रिल आणि २६ मे २०२१ हे दोन जुळे सुपरमून आहेत. दोन्ही वेळेस चंद्र आणि पृथ्वीमधील अंतरात केवळ १५७ कि.मी.चा फरक असेल, असे प्रा. चोपणे यांनी सांगितले.
* रंगाशी संबंध नाही!
चंद्र जेव्हा जवळ येतो तेव्हा चंद्राच्या गुरुत्वाकर्षाणामुळे समुद्राला मोठी भरती येते. पाश्चात्य लोकांनी या पौर्णिमेला पिंक मून म्हणून संबोधले असले तरी त्याचा रंगाशी काहीही संबंध नाही. सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगवताना मोठ्या आकाराचा दिसेल. सुपरमून पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नाही. परंतु दुर्बिणीला फिल्टर लावून त्यावरील विवर पाहता येईल.
..............................