Join us

पनवेलमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालय

By admin | Published: June 28, 2015 1:23 AM

सिडकोने पनवेल येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी व सहकार तत्त्वावर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

नवी मुंबई : सिडकोने पनवेल येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी व सहकार तत्त्वावर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी हैदराबाद येथील एमएनआर शैक्षणिक संस्थेला खांदा कॉलनी येथील एनएमएमटी आगारासमोर आरक्षित असलेला १० हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड लीजवर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिडकोचा नैना प्रकल्प आदींमुळे पनवेल व परिसराचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्याअनुषंगाने लोकसंख्याही वाढत आहे. भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येला पूरक आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने सिडकोने पनवेल परिसरात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा, एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर व प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे व जेएनपीटीचे अध्यक्ष नीरज बन्सल उपस्थित होते. पुढील चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करणे संबंधित निविदाधारकाला बंधनकारक केले आहे. तसेच रुग्णालयातील सर्व सुविधांमध्ये अल्प उत्पन्न गट, प्रकल्पग्रस्त आणि सिडकोच्या आजी - माजी कर्मचाऱ्यांना ४० टक्के आरक्षण ठेवण्याची अट घालण्यात आली आहे. (प्रतिनिधी)