लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी आरंभ होण्यापूर्वीच मुंबईला येत्या २० मे रोजी होणाऱ्या पाचव्या टप्प्यासाठीच्या राजकीय गरमागरमीची रविवारी चाहूल लागली. या वातावरणातच प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा आणि भेटीगाठींमुळे रविवारचा दिवस सुपरसंडे ठरला.
भाजपचे राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, काँग्रेसचे तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रचारसभा, भेटीगाठी यामुळे मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला होता.
थरूर यांनी काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधत ४ जून रोजी भाजपचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा दावा केला. नरेंद्र मोदी हे सप्टेंबर २०२५ नंतर पंतप्रधानपदी राहणार नाहीत. मग भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, असा सवाल ‘आप’चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता मोदी हे ४ जूननंतरच या पदावर दिसणार नाहीत, असे थरूर म्हणाले.
प्रचाराचा धुरळा
मुंबईत असा राजकीय धुरळा उडत असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाशिंद आणि कल्याण येथे सभा झाल्या तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाणे आणि कल्याण येथे शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के व श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कळवा येथे आयोजित सभेला हजेरी लावली.
सर्वपक्षीय नेते उतरले मैदानात
राजस्थान आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईत स्थायिक झालेल्या त्यांच्या राज्यातील मूळ रहिवाशांशी संवाद साधला. पुष्करसिंह धामी यांनी विलेपार्ले येथे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाचे भाजप उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासाठी एका बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर भांडुप (प.) येथे उत्तर पूर्वचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यासाठी एका बैठकीला ते उपस्थित होते. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासाठी ते दहिसर (पू.) येथे एका बैठकीलाही उपस्थित राहिले व विविध समुदायांना भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
उद्धव ठाकरे यांनी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांच्यासाठी ट्रॉम्बे येथे तर आदित्य ठाकरे यांनी प्रतीक्षानगर येथे सभा घेतल्या. तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी साकीनाका येथे मुंबई उत्तर मध्यचे भाजप उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासाठी आणि विक्रोळी येथे मुंबई उत्तर पूर्वचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यासाठी सभा घेतल्या. मुंबई उत्तर पूर्वमध्येच उद्धव सेनेचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्यासाठी भांडुप पश्चिम येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. तेथेही आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली.