Join us

लोकार्पण, भूमिपूजनांचा सुपर सण्डे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते आचारसंहितेपूर्वी विकासकामांचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 1:35 PM

चर्नी रोडजवळील जवाहर बालभवन येथे दूरदृश्य प्रणालीने झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह राज्यात सर्वत्र लोकार्पण आणि भूमिपूजनाद्वारे विविध पायाभूत सुविधा, उद्योग आणि कल्याणकारी योजनांना चालना देण्यात आल्याचे स्पष्ट केले.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. त्यानंतर आचारसंहिता लागू होणार असल्याने कोणत्याही विकासकामांचे लोकार्पण वा भूमिपूजन करता येणे अशक्य असल्याने रविवारी शहर आणि उपनगरांतील विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यातही ऑनलाइन उद्घाटन, भूमिपूजनावर अधिक भर होता. 

चर्नी रोडजवळील जवाहर बालभवन येथे दूरदृश्य प्रणालीने झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह राज्यात सर्वत्र लोकार्पण आणि भूमिपूजनाद्वारे विविध पायाभूत सुविधा, उद्योग आणि कल्याणकारी योजनांना चालना देण्यात आल्याचे स्पष्ट केले. राज्याच्या विकासातील हा महत्त्वाचा भाग असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई महापालिका आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत केल्या जाणाऱ्या ५० प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

 या कामांचे झाले भूमिपूजन-  मुंबादेवी तसेच महालक्ष्मी परिसरातील विकासकामे-  ॲन्टॉप हिलमधील जगन्नाथ शंकरशेट स्मारक-  छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील भागोजी शेठ कीर स्मारक-  माहीम कोळीवाडा येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या पदपथ (प्रॉमेनेड) व संरक्षक भिंतीचे सुशोभिकरण-  माहीम कोळीवाडा, अरुणकुमार वैद्य मार्गाचे पदपथ सुशोभिकरण-  विधानभवन, लायन गेट, उच्च न्यायालयासमोर के. बी. पाटील मार्ग, फॅशन स्ट्रीट खाऊ गल्ली, बाणगंगा वाळकेश्वर, अरुणकुमार वैद्य मार्ग, माहीम रेतीबंदर समुद्रकिनारा येथील प्रस्तावित स्वच्छतागृहेलोकार्पण कशाचे?-  जे. जे. उड्डाणपुलाखाली हो-हो बेस्ट बसमध्ये निर्मित कलादालन व वाचनालय-  बधवार पार्क येथील फूड ट्रक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील नगर चौक-  फॅशन स्ट्रीट, ग्रँट रोड रेल्वे स्थानक (पश्चिम) येथील ‘पिंक टॉयलेट’-  महापालिकेच्या १०३ शाळांमधील टेरेस गार्डन व सीसीटीव्ही कॅमेरा सुविधा

अभिजात दर्जामुळे मराठीचा डंका सर्वत्र  -  माय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने आता मराठीचा डंका अधिक जोमाने सर्वत्र गाजणार आहे.-  मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी मुंबईत होत असलेले मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली, तसेच भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी अधिक जोमाने काम करूया, असेही ते म्हणाले.

पुस्तकाचे गाव -  मुंबईत येणाऱ्या साहित्यिकांसाठी राहण्याची सोय व्हावी यासाठी कवी मंगेश पाडगावकर यांच्या नावाने नवी मुंबईतील ऐरोलीत साहित्य भवन बांधणार असल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले, तसेच सातारा येथे विश्वकोश मंडळासाठी नवीन इमारत, प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :एकनाथ शिंदे