मुंबई शहरात येऊन आपली कला सादर करण्याची इच्छा देशातल्या सर्व प्रांतांमधल्या कलाकारांची असते. कारण मुंबई ही खऱ्या अर्थाने संगीताच्या दृष्टीने देशाची राजधानी आहे. इथे वर्षातले सर्व आठवडे कुठे ना कुठे आणि कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे कार्यक्रम सुरू असतात. मुंबईतला सर्वांत मोठा संगीताचा उत्सव विलेपार्ले (पू.) भागात जानेवारी महिन्यात होतो. ‘हृदयेश’तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या महोत्सवात देशातले नामवंत कलाकार सहभागी होतात. ‘हृदयेश’तर्फे दरवर्षी संगीत सेवाव्रती पुरस्कार देण्यात येतो. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ सतारवादक कार्तिककुमार यांना समारंभपूर्वक तबलानवाज झाकिर हुसेन यांच्या हस्ते देण्यात आला.जयतीर्थ मेवुंडी यांच्या गायनाने महोत्सवाला सुरुवात झाली. मेवुंडी हे आजच्या जमान्यातले लोकप्रिय गायक आहेत. त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य कशात दडले आहे? ते भीमसेन जोशींची आठवण करून देतात. विशेषत: त्यांची तानक्रिया आणि त्यातला जोश हा भीमसेनांचा आभास निर्माण करून देतो. त्यांनी ‘शुद्धकल्याण’ हा राग म्हटला आणि भीमसेननी लोकप्रिय केलेले ‘लक्ष्मीबारम्मा’ हे कन्नड भजन म्हटले आणि उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. कौशिकी चक्रवर्तीही आजच्या जमान्यातील लोकप्रिय गायिका. अजय चक्रवर्तींच्या या कन्येने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. ‘मधुवंती’ राग त्यांनी म्हटला. निकोप आवाज, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि आक्रमक प्रवृत्ती, यामुळे त्या मैफल मारून नेतात. त्यांनी दाक्षिणात्य संगीतातील तराणा म्हणजे ‘तिल्लाना’ सादर केला. राकेश चौरसिया यांनी बासरीवर ‘जोग’ आणि ‘हंसध्वनी’ हे राग सादर केले. मुकुल शिवपुत्र यांच्या गाण्यातून कुमारांच्या गाण्याची जी झलक मिळते ती और असते. मुकुल यांचे व्यक्तिमत्त्व गूढरम्य आहे. त्यांनी ‘शंकरा’, ‘बसंत’ वगैरे रागातल्या रचना मनापासून गायल्या.
शानदार संगीतोत्सव
By admin | Published: January 23, 2017 6:01 AM