कोरोनाचा 2 महिन्यांत सुपरफास्ट प्रवास; मुंबईत २४ जानेवारीला रुग्णसंख्या शून्य, २४ मार्चला ८६
By संतोष आंधळे | Published: April 2, 2023 01:35 PM2023-04-02T13:35:57+5:302023-04-02T13:37:03+5:30
रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्युदर फार कमी
संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येची धास्ती सर्वच आरोग्य यंत्रणांनी घेतली असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अलर्ट मोडवर आहे. दोन महिन्यांपूर्वी जवळपास तीन वर्षांनंतर मुंबईत कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याची नोंद झाली होती. त्यावेळी मुंबईने कोरोनावर विजय मिळविला, अशीच सर्वसाधारण भावना नागरिकांमध्ये होती. मात्र, दोन महिन्यांनंतर मात्र त्याच कोरोनाचे ८० पेक्षा अधिक रुग्ण झाल्याची नोंद मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोंदविली असल्याने सर्व स्तरांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
- नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
- सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना
- रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्युदर फार कमी
कोरोनाचा पहिला रुग्ण १६ मार्च २०२० अंधेरी परिसरात सापडला होता. त्यानंतर कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत होती. कालांतराने आलेख घसरून सपाट झाला. २४ जानेवारी रोजी मुंबईत एकही कोरोनाबाधित सापडला नव्हता. तब्बल तीन वर्षांनंतर हे घडले होते. त्यानंतर एका महिन्याने २४ फेब्रुवारीला महापालिका हद्दीत कोरोनाच्या ५ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. तर त्यानंतरच्या महिन्यात २४ मार्च रोजी मुंबईत ८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. दोन महिन्यांत इतक्या झपाट्याने नवीन रुग्णांची नोंद झाल्याने केंद्रीय तसेच राज्याच्या आरोग्य विभागाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. महापालिकेनेसुद्धा सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. विशेष म्हणजे, रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्युदर कमी असून, फार कमी प्रमाणात रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत होते. मुंबईच्या आरोग्य विभागाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, १८९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, सध्याच्या घडीला शहरात १०२१ सक्रिय रुग्ण आहेत.
- २४ मार्च रोजी मुंबईत ८६ नवीन रुग्णांची नोंद झाली
- शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, १८९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद
- सध्याच्या घडीला शहरात १०२१ सक्रिय रुग्ण आहेत.