लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सुपरफ्लॉवर मून २६ मे रोजी पहावयास मिळणार आहे. या वर्षातील हे एकमेव खग्रास चंद्रग्रहण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि पूर्व आशियातून सुपरब्लड मून म्हणून पहावयास मिळेल. २६ तारखेला दुपारी चंद्रग्रहणाला सुरुवात होत आहे. भारतातून मात्र चंद्रोदय होताना ३५ मिनिटांसाठी छायाकल्प चंद्रग्रहण दिसेल. २०२१ वर्षातील हा दुसरा सुपरमून असून, या पौर्णिमेला फ्लाॅवर मून असे म्हणतात.
स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले की, या वेळेस चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर वर्षातील सर्वात कमी म्हणजे ३,५७,३११ किमी असल्याने चंद्र १५ टक्के मोठा आणि ३० टक्के तेजस्वी दिसेल. प्रत्येक वर्षी सुपरमूनच्या वेळेस चंद्र व पृथ्वी यांच्यामधील अंतर कमी-अधिक होत असते. हे कमीत कमी अंतर ३,५६,५०० किमी तर दूरचे अंतर ४,०६,७०० किमी असते. या वर्षीचे पृथ्वी-चंद्र सर्वाधिक कमी अंतर २६ मे रोजी होणाऱ्या सुपरमूनच्या वेळी राहणार आहे.
* या दिवशी चंद्र आला हाेता पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ
- २६ जानेवारी १८४८ रोजी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ आला होता. तर, नोव्हेंबर २०१६ला चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ आला होता. २७ एप्रिल आणि २६ मे रोजी होणारे सुपरमून हेही खूप कमी अंतराचे राहील. पृथ्वी आणि चंद्रातील सर्वाधिक कमी अंतर हे २५ नोव्हेंबर २०३५ रोजी असेल. ६ डिसेंबर २०५२ रोजी शतकातील सर्वात मोठा सुपरमून दिसेल.
* सुपरब्लड मून असे नाव का?
- पौर्णिमेचा चंद्र ग्रहणात लाल दिसतो म्हणून या पौर्णिमेला सुपरब्लड मून असे म्हणतात. भारताच्या अनेक राज्यातून हे चंद्रग्रहण दिसणार असले तरी पूर्वेत्तर भारत, आसाम आणि मणिपूर येथून खंडग्रास ग्रहण दिसेल. दुपारी २.१८ वाजता ग्रहणाला सुरुवात झालेली असेल. आपल्याकडे संध्याकाळी ७.२० वाजता ग्रहण सुटेल. ग्रहण ३५ मिनिटांसाठीच पाहता येईल. मात्र रात्रभर सुंदर सुपरमून पाहता येईल.
-------------------