मुंबई - राज्य सरकारच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड हे रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेचा वापर कामावरुन घरी जाण्यासाठी आणि शासकीय कामासाठी वापरत असल्याचं ड्रायव्हरच्या डायरीतून उघड झालं आहे. तीन वर्षापूर्वी मधुकर गायकवाड यांची रुग्णालय अधीक्षकपदावर नेमणूक झाली.
रुग्णालयाच्या चारही रुग्णवाहिका मधुकर गायकवाड वापरत असल्याचं समोर आलं आहे. या रुग्णवाहिकेत अत्याधुनिक तंत्रज्ञानासह कार्डिअक केअर उपकरणांचा समावेश आहे. मुंबई मिरर या इंग्रजी दैनिकाने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. डॉ. मधुकर गायकवाड यांनी आतापर्यंत तब्बल २४० वेळा वैयक्तिक कामासाठी आणि ९० वेळा शासकीय कामासाठी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेचा वापर केला आहे. गेल्यावर्षी २५ वेळा त्यांनी एकट्याने रुग्णवाहिका वापरली आहे. जे.जे रुग्णालयातील शासकीय अधिकाऱ्यांच्या वसाहतीत ते कुटुंबासह राहतात. त्यामुळे अनेकदा रुग्णवाहिकेने त्यांना घरी सोडलं आहे.
याप्रकरणी मुधकर गायकवाड यांनी सांगितले की, शहराच्या वाहतूक कोंडीतून जाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. कधीकधी मला ऐनवेळी बैठकीला येण्यासाठी बोलावलं जातं. त्यावेळी जर मी रुग्णवाहिकेत असेन तर वाहतूक कोंडीत अडकत नाही, इतर वाहनचालकही सहकार्य करतात. सरकारकडून मला शासकीय वाहन नाही असं सांगत असताना मी कधीही वैयक्तिक कामासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
पण, रुग्णवाहिकेची खरी गरज ही रुग्णांना असते, मधुकर गायकवाड यांच्यासाठी प्राधान्य नसावं असं काही जणांचे म्हणणं आहे. रुग्णालयाच्या लॉगबुकमध्ये 'अधीक्षकसाहेबांना घरी सोडण्यात आले, अधीक्षक साहेबांना कोर्टात घेऊन गेलो, अधीक्षकसाहेबांना जे.जे हॉस्पिटलमध्ये मिटींगसाठी घेऊन गेलो आणि आलो अशाप्रकारच्या नोंदी रुग्णवाहिकेच्या वापराबाबत आढळतात. यातील दोन रुग्णवाहिका स्वयंसेवी संस्थांकडून गरिब रुग्णांसाठी मदत म्हणून पुरवण्यात आल्या आहेत.
मार्च २०१७ मध्ये डॉ. मधुकर गायकवाड यांनी वैद्यकीय अधीक्षकाचा पदभार स्वीकारल्यापासून रुग्णवाहिकेचा वापर करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्यांदा ५ मार्च २०१७ रोजी जे.जे रुग्णालयात बैठकीसाठी जाण्यासाठी त्यांनी रुग्णवाहिकेचा वापर केला. संध्याकाळी 6.40 वाजता बैठकीला गेले, त्यानंतर रात्री 10.20 वाजता ही रुग्णवाहिका सेंट जॉर्जकडे परत आली. अंदाजानुसार ४ रुग्णवाहिकेचा जवळपास ८ हजार किमी प्रवास अधिकाऱ्यांनी घरापर्यंत, कोर्टापर्यंत आणि शासकीय बैठकांना जाण्यासाठी केला असावा.
दरम्यान, रुग्णवाहिकेचा वापर केवळ रुग्णांना घेऊन जाण्यासाठी आहे. डॉ. गायकवाड यांनी रुग्णवाहिकेचा केलेला वापर व्यवहार्य नाही, राज्य शासकीय रुग्णालयामध्ये सर्व अधीक्षकांना बैठकीला जाण्यासाठी प्रवास भत्ता दिला जातो. त्यामुळे डॉ. गायकवाड यांनी रुग्णवाहिकेचा वापर करुन प्रवास भत्ता मागितला आहे का याचा तपास केला जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय प्रमुख डॉ. टी. पी. लहाने यांनी दिली. तर अशाप्रकारे रुग्णवाहिकेचा वापर करणं कायदेशीर गुन्हा आहे असं मत समाजसेवक संजय गुरव यांनी केली आहे.