Join us  

२० महिन्यांनंतर प्रथमच मुंबईहून सुपरजम्बो विमाने झेपावणार; १० जानेवारीपासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 8:44 AM

नियोजित तत्त्वावर या विमानांचे उड्डाण होणार असून, मुंबई ते सिंगापूर मार्गावर ती सेवा देणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तब्बल २० महिन्यांनंतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुपरजम्बो विमाने झेपावणार आहेत. १० जानेवारीपासून नियोजित तत्त्वावर या विमानांचे उड्डाण होणार असून, मुंबई ते सिंगापूर मार्गावर ती सेवा देणार आहेत.

कोरोना काळात प्रवासी संख्या मंदावल्याने तुलनेने मध्यम आकाराची विमाने धावपट्टीवर उतरविली जात होती. मात्र, गेल्या काही दिवसापासून प्रवासीसंख्या पूर्वपदावर येऊ लागल्याने, त्यांना सामावून घेण्यासाठी सुपरजम्बो विमाने सेवेत दाखल करण्याचा निर्णय सिंगापूर एअरलाईनने घेतला आहे. त्यानुसार, येत्या १० जानेवारीपासून मुंबई-सिंगापूर मार्गावर एअरबस ए-३८० या प्रकारातील विमाने तैनात केली जाणार आहेत. तर पुढील टप्प्यात १४ फेब्रुवारीपासून दिल्ली ते सिंगापूर मार्गावर अशी विमाने दाखल केली जातील. सध्या मुंबई-सिंगापूर मार्गावर उड्डाण घेणाऱ्या एअरबस ए-३५०-९०० या विमानाची जागा ए-३८० विमाने घेतील. १० जानेवारीपासून नियोजित वेळापत्रकानुसार सुपरजम्बो विमानांसह सेवा सुरू ठेवण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

फायदा काय होणार?

- आसन निवडीसाठी बहुपर्याय उपलब्ध- सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर अंमलबजावणी शक्य- विलगीकरणमुक्त प्रवास करणे शक्य. 

टॅग्स :मुंबईविमानतळ