आज सुपरमून दिसणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 05:41 AM2018-01-01T05:41:20+5:302018-01-01T05:41:37+5:30
आज नूतन वर्षारंभी १ जानेवारी रोजी सोमवारी रात्री सर्वांना साध्या डोळ्यांनी ‘सुपरमून’चे दर्शन होणार असल्याची माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली.
मुंबई : आज नूतन वर्षारंभी १ जानेवारी रोजी सोमवारी रात्री सर्वांना साध्या डोळ्यांनी ‘सुपरमून’चे दर्शन होणार असल्याची माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली.
आज सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी पौष पौर्णिमा सुरू होईल. चंद्र पृथ्वीपासून सरासरी तीन लक्ष ८४ हजार किलोमीटर दूर असतो. पौर्णिमेला जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला ‘सुपरमून’ म्हणतात. अशा वेळी चंद्रबिंब नेहमीच्या पौर्णिमेपेक्षा चौदा टक्के मोठे व तीस टक्के जास्त प्रकाशित दिसते. सोमवारी चंद्र पृथ्वीपासून तीन लक्ष ५६ हजार किलोमीटर अंतरावर येत आहे. त्यामुळे आपणास सुपरमूनचे दर्शन होणार आहे.
उद्या सायंकाळी पाच वाजून ३४ मिनिटांनी चंद्र उगवेल आणि मंगळवारी सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी मावळेल. या वर्षी जानेवारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ जानेवारीला चंद्रग्रहणाच्या खग्रास स्थितीमध्ये ‘सुपर ब्ल्यू मून’ उगवताना आपणा सर्वांस दिसणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले. पुरी, भुवनेश्वर, कट्टक, चंद्रपूर, जालना, औरंगाबाद, नाशिक, रायपूर, नागपूर, यवतमाळ, अमरावती, भुसावळ, बीड, अहमदनगर, पुणे, मुंबई अशा सर्व शहरांतून सूपरमून दिसणार आहे.