लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण आज, २६ मे रोजी दुपारी ३. १५ ते सायंकाळी ६.२३ यावेळेत होणार असून ते आपल्या येथून दिसणार नाही. मात्र या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने सुपरमूनचे दर्शन संपूर्ण भारतात होणार आहे, असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
चंद्रग्रहण अतिपूर्व ईशान्य भारतातून ओरिसातील पुरी, भुवनेश्वर, कटक, कोलकत्ता, आसाम, मिझोराम , मेघालय, नागालँड, अरुणाचल, मणिपूर आणि अंदमान निकोबार बेटे येथून दिसणार आहे. चंद्रग्रहण चीन, जपान, कोरिया, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिकेतील काही भाग येथून दिसणार आहे.
२६ मे रोजी सायंकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी सुपरमून पूर्वेला उगवेल. रात्रभर आकाशात सुंदर, मनोहारी दर्शन देऊन उत्तररात्री ६ वाजून ३६ मिनिटांनी मावळेल. तर आता २०२२ मध्ये १४ जून व १३ जुलै रोजी सुपरमून स्थिती होणार आहे. परंतु ते दिवस पावसाळ्याचे असल्याने दर्शन होणे कदाचित कठीण जाणार आहे.
२०२३ मध्ये सुपरमून दिसणार नाही. २०२४ मध्ये १८ सप्टेंबर व १० ऑक्टोबर, २०२५ मध्ये ५ नोव्हेंबर व ४ डिसेंबर आणि २०२६ मध्ये २४ डिसेंबर रोजी सुपरमून दर्शन होणार आहे.
बुधवारी दिसणाऱ्या सुपरमूनचे दर्शन सर्वांना घेता यावे याकरिता वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्राच्या वतीने एका ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार, बुधवारी रात्री ८.३० वाजता केंद्राचा ऑनलाईन कार्यक्रम सुरू होईल. रात्री ९ वाजेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात विज्ञान प्रेमींना सुपरमूनचे दर्शन ऑनलाइन घेता येईल.