सुपरस्प्रेडर्सची पुन्हा कोरोना चाचणी होणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:19 AM2020-11-22T09:19:46+5:302020-11-22T09:19:46+5:30
मनोहर कुंभेजकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य शासनाने अनलॉक मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या स्तरावर सुरू केला आहे. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ...
मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य शासनाने अनलॉक मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या स्तरावर सुरू केला आहे. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर राज्यातील प्रार्थनास्थळे सुरू झाली आहेत. लोकलच्या फेऱ्या वाढल्या असून लांब पल्ल्याच्या बसेसही सुरू झाल्या आहेत.
नुकत्याच साजरा झालेल्या दिवाळी सणानिमित्त मोठ्या रेस्टारंटमध्ये वीस वीस जण एका टेबलवर बसले होते. तर मोठ्या एअरकंडिशन रेस्टॉरंटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. तर ५० टक्के नागरिकांना येथे प्रवेश द्या याकडेही दुर्लक्ष केले जाते. रेस्टारंटमध्ये नागरिक सुमारे एका तासाहून अधिक काळ संपर्कात असतात. वास्तविक पाहता कोरोना संसर्गाला १५ मिनिटांचा कालावधीसुद्धा पुरेसा होतो.
मास्क न वापरण्याची आगळीक सर्रास होत आहे. मास्क न वापरणे हे नागरिकांना कमीपणाचे वाटत आहे, नेमके हे अमेरिका व लंडनच्या बाबतीत झाले. ओपन एअर रेस्टॉरंट किंवा ओपन डायनिंगची पद्धत सुरू केली खरी, पण दुसरीकडे कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. हजारो कोरोना रुग्ण रोज सापडत आहेत. पुण्यात तर गेल्या बुधवारी २४ तासात २३ नागरिकांचा मृत्यू झाला. वैद्यकीय यंत्रणा व डॉक्टर्स काही भागात कमी पडत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
रिक्षा, ड्रायव्हर, दुकानदार, फेरीवाले, भाजीवाले, घरगुती कामगार हे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे हेही सुपरस्प्रेडर्स ठरू शकतात. ते लक्षणेविरहित असूनही त्यांची रॅपिड अँटिजेन कोरोना टेस्ट करणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले.
त्यामुळे येणाऱ्या काळात हात सतत धुणे, मास्क लावणे, किमान २ मीटरचे अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळण्याचा आग्रह व न पाळणाऱ्यांना कठोर शासन केल्यास आपल्याकडे दुसरी लाट आटोक्यात येईल. अन्यथा लंडन व अमेरिकेसारखे पुन्हा लॉकडाऊन आणावे लागेल, असे मत डॉ. दीपक सावंत यांनी शेवटी व्यक्त केले.
----------------------------