मुंबई - जुहू येथील ऋतुंबरा कॉलेजमध्ये सुविधायुक्त 25 ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी या कोविड सेंटरसाठी मदतीचा हात दिला आहे. या कोविड सेंटरला लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च त्यांनी केला आहे.
अंधेरी पश्चिम भाजप आमदार अमित साटम यांच्या प्रयत्नाने व मुंबई महापालिकेच्या सहकार्याने येथे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. येथील प्रसिद्ध डॉ. जयंत बर्वे यांच्याहस्ते या कोविड सेंटरचे लोकार्पण झाले. यावेळी के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, अंधेरीतील पालिकेचे भाजप नगरसेवक, पालिकेचे अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या कोविड सेंटरमध्ये मेडिटेशन सेंटर, सकस शाकाहरी जेवण, व्हील चेअरची सुविधा, फिजिओथेरपी, मेंटल हेल्थ कॉन्सीलिंग, पॅथ लॅब, सीटी स्कॅन आदी सुविधांनी हे सुसज्ज कोविड सेंटर येथे उभारण्यात आले आहे अशी माहिती आमदार अमित साटम यांनी दिली.
हॉट स्पॉट असलेल्या अंधेरीत कोविड जरी काही प्रमाणात नियंत्रणात असला तरी येथील अंधेरी-जुहू परिसरातील नागरिकांना सुसज्ज कोविड सेंटर उभारण्याचा आमदार अमित साटम आणि येथील भाजप नगरसेवकांनी निर्धार केला आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी या कोविड सेंटरसाठी मदतीचा हात दिला. त्यामुळे अंधेरीकांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.