३० जुलै १९२८ रोजी बेळगावमध्ये जन्मलेल्या सुलोचना यांचा वयाच्या चौदाव्या वर्षीच विवाह झाला होता. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९४६ मध्ये रिलीज झालेल्या ‘सासुरवास’ या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर १९५३ मध्ये आलेल्या ‘वहिनीच्या बांगड्या’ या चित्रपटाने इतिहास घडवला. या चित्रपटात त्यांचे जावई डॉ. काशीनाथ घाणेकर यांनी त्यांच्या धाकट्या दीराची भूमिका साकारली होती. पुढे सुलोचना यांची कन्या कांचन यांचा विवाह काशीनाथ घाणेकरांशी झाला. सुलोचना यांनी ‘मीठ भाकर’, ‘सांगते ऐका’, ‘लक्ष्मी आली घरा’, ‘मोठी माणसं’ या एका मागोमाग एक सुपरहिट चित्रपट देत त्या तमाम रसिकांच्या लाडक्या दीदी बनल्या. देव आनंद, सुनील दत्त, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, आदी सुपरस्टार अभिनेत्यांच्या आईची ऑनस्क्रीन भूमिका साकारत त्यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटविला.
पद्मश्री मिळाला पण...
१९९९ मध्ये जेव्हा सुलोचना यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्याबाबतची वेगळी बातमी कोणत्याही वर्तमानपत्रात आली नव्हती. त्या काळी आजसारख्या वृत्तवाहिन्या नव्हत्या. दुसऱ्या दिवशी सुलोचना वर्तमानपत्रात बातमी शोधू लागल्या. बातमीमध्ये सुलोचना लाटकर असे नाव होते. त्यांना सर्व जण सुलोचनादीदी म्हणून ओळखत असल्याने वर्तमानपत्रांकडून त्याची दखल घेतली नाही. सुलोचना यांनी इसाक मुजावरांशी संपर्क साधल्यानंतर दुसऱ्या दिवशी ‘सुलोचनादीदींना पद्मश्री पुरस्कार’ या मथळ्याखाली स्वतंत्र बातमी प्रकाशित झाली.
मराठी चित्रपट
सांगते ऐका, मोलकरीण, मराठा तितुका मेळवावा, साधी माणसं, एकटी, सासू वरचढ जावई, जिवाचा सखा, प्रपंच, वहिनीच्या बांगड्या, मी तुळस तुझ्या अंगणी, माझी माणसं, बाळा जो जो रे, मीठभाकर, सासुरवास.
हिंदी चित्रपट
अब दिल्ली दूर नहीं, दिल देके देखो, आई मिलन की बेला, संपूर्ण रामायण, बंदिनी, जौहर-महमूद गोवा में, देवर, नई रोशनी, संघर्ष, सरस्वतीचंद्र, आदमी, संबंध, कटी पतंग, जॉनी मेरा नाम, मैं सुंदर हूं, दिल दौलत दुनिया, कहानी किस्मत की, कोरा कागज़, मजबूर, कसौटी, मुकद्दर का सिकंदर, आज़ाद, आशा, गुलामी, काला धंदा गोरे लोग, खून भारी मांग, जरा सी जिंदगी, हिम्मतवाला, फुलवारी, अंदर बहार, जब प्यार किसीसे होता है, प्यार मोहब्बत, दुनिया, अमीर गरीब, वॉरंट, जोशिला, बहरों के सपने, डोली, कटी पतंग, मेरे जीवन साथी, प्रेम नगर, आक्रमण, भोला भला, त्याग, आशिक हूँ बहरों का, अधिकार, हीरा, झुला, एक फूल चार कांटे, सुजाता, मेहरबान, चिराग, भाई बहन, रेश्मा और शेरा.
घरी आले होते महानायक...
सहा-सात वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ऑनस्क्रीन आईची म्हणजेच सुलोचना यांची त्यांच्या प्रभादेवी येथील राहत्या घरी जाऊन भेट घेतली होती. सुलोचना यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अमिताभ त्यांच्या घरी गेले होते.
...आणि भिकाऱ्याने अंगावर फेकला रुपया
‘मजबूर’ या हिंदी चित्रपटात त्या महानायक अमिताभ बच्चन यांच्या आई बनल्या होत्या. एकदा माहीमजवळ सिग्नलला त्यांची गाडी उभी असताना एक भिकारी त्यांच्याकडे पैसे मागू लागला. खिडकीची काच खाली करून त्यांनी भिकाऱ्याला एक रुपया दिला. रुपया पाहून भिकारी रागावला आणि अमिताभची आई असून एक रुपया देतेस, असे म्हणून त्याने सुलोचना यांनी दिलेला रुपया त्यांच्या अंगावर फेकला. त्याला सुलोचना खरोखर अमिताभच्या आई वाटल्या होत्या.
सुलोचना दीदी प्रेमळ आईचे प्रतिरूप होत्या. आपल्या सशक्त अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. पडद्यावर तसेच पडद्याबाहेर त्या सुहृद व्यक्ती होत्या. - रमेश बैस, राज्यपाल.
मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात आपल्या सहजसुंदर अभिनयाने असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.
सुलोचनादीदी यांच्या निधनाने एका सदाबहार व्यक्तिमत्त्वाला आज महाराष्ट्र मुकला आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्याही काळात आघाडीच्या अभिनेत्री म्हणून त्यांनी मोठा कालखंड गाजवला आणि त्यानंतरसुद्धा सातत्याने विविध भूमिका त्यांनी साकार केल्या. व्यक्तिरेखा हुबेहूब जिवंत करणाऱ्या वात्सल्यमूर्ती आणि एका महान कलावंताला आज आपण सारे मुकलो आहोत. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.
मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन अतिशय दुःखद आहे. सुलोचनादीदींचा अभिनय मराठी प्रेक्षक कधीही विसरू शकणार नाहीत. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी एक महान अभिनेत्रीला मुकली आहे. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
सत्तर वर्षांची प्रदीर्घ यशस्वी कारकीर्द असलेल्या सुलोचनादीदी यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यांनी स्वतःच्या मृदू स्वभावातून आदर्श निर्माण केला. शांत, सोज्वळ आणि नम्र अभिनेत्री म्हणून त्या कायम सर्वांसाठी आदरणीय होत्या व कायम स्मरणात राहतील. - सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री.
चित्रपटसृष्टीतील सात्विक, सोज्ज्वळ चेहरा
राजा परांजपे यांच्या ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटासाठी मी त्यांचा सहायक दिग्दर्शक होतो. एडिटिंगचे काम सुरू असताना सुलोचनादीदी तिथे आल्या आणि त्यांची भेट झाली. मी हॉटेलमध्ये राहत असल्याचे समजल्यावर दीदींनी परांजपेंना विचारले की या मुलाला म्हणजे मला हॉटेलवर का ठेवले? याला माझ्या घरी पाठवा. खऱ्या अर्थाने त्या मायेची पाखर घालणाऱ्या माऊली होत्या. चित्रपटात त्या जशा सोज्ज्वळ भूमिका साकारायच्या तशाच त्या वास्तवातही होत्या. - राजदत्त, ज्येष्ठ दिग्दर्शक.
मराठी सिनेसृष्टीतील सुवर्णकाळ गाजविणाऱ्या सुलोचनादीदी होत्या. त्यांनी आमच्यासमोर आदर्श ठेवला. त्यांच्या नंतरची आमची पिढी आहे. माझ्या त्या चांगल्या संपर्कात होत्या. प्रत्येक वाढदिवसाला आवर्जून फोन करायच्या. माझे चांगले काम पाहिले की कौतुक करायच्या. समोरच्याला प्रोत्साहन देण्याचा गुण त्यांच्याकडे होता. सोज्ज्वळता आणि सात्विकता त्यांच्या चेहऱ्यात ओतप्रोत भरलेली होती. मराठीसोबत त्यांनी हिंदी सिनेसृष्टीही गाजविली. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार न मिळाल्याची खंत आहे. जयप्रभा स्टुडिओचा टिळा कपाळाला लावून भालजी पेंढारकरांचे शिष्यत्व आयुष्यभर जपले. मुंबईत येणाऱ्या कलाकारांना आधार द्यायच्या. - अलका कुबल, अभिनेत्री.
दीदींबाबत बोलण्यासाठी शब्दच नाहीत. इतका सात्विक आणि सोज्ज्वळ चेहरा मराठी चित्रपटसृष्टीत शोधून सापडणार नाही. सर्वजण त्यांना दीदी म्हणायच्या, पण माझ्यासाठी त्या आजीचे स्वरूप होत्या. जेव्हा कधी भेटायच्या तेव्हा भरभरून आशीर्वाद द्यायच्या. घरी बसलेल्या असायच्या, पण त्यांना सर्व माहीत असायचे. अशी माणसे जेव्हा जातात तेव्हा एक पर्व संपल्यासारखे वाटते. आता इतकी वडीलधारी व्यक्ती कोणीच नाही. जशा होत्या तशा राहिल्या याचा आनंद आहे. - केदार शिंदे, दिग्दर्शक