Join us

अंधश्रद्धा हे बुद्धी चुकार लोकांचे विश्रामगृह आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:06 AM

मुंबई : अंधश्रद्धा हा एक धर्ममान्य आणि लोकमान्य धंदा बनला असून ते बुद्धीचुकार लोकांचे विश्रामगृह आहे. आळशी लोकांसाठीचे ते ...

मुंबई : अंधश्रद्धा हा एक धर्ममान्य आणि लोकमान्य धंदा बनला असून ते बुद्धीचुकार लोकांचे विश्रामगृह आहे. आळशी लोकांसाठीचे ते आयोजन, तत्त्वज्ञान, शॉर्टकट आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नव्याने सुरू केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका या ई-मासिकाच्या ऑनलाइन प्रकाशन समारंभात डॉ. यशवंत मनोहर बोलत होते. अध्यक्षीय मनोगत महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.

यशवंत मनोहर म्हणाले की, राजकारणात पुष्कळ अंधश्रध्दा असून राजकारणी जाणीवपूर्वक अंधश्रद्धांचा प्रसार करतात. त्यात त्यांचे हित आहे. सर्व धर्ममार्तंड हे समाजव्यवस्थेच्या धुरीणांचे चाकर असतात. त्यांच्या मदतीने हे धुरीण अंधश्रद्धांचा फैलाव करतात. लोकांनी विचार करणे, प्रश्न विचारणे हे व्यवस्थेच्या धुरीणांना अडचणीचे असते. त्यामुळे लोकांची विचारशक्ती हे धुरीण नष्ट करतात आणि मग लोक अंधश्रद्धेच्या आहारी जातात.

माणूस भयग्रस्ततेने परावलंबी होऊन बुद्धीपासून दूर जातो. मात्र विचार करणारी बुद्धी ही मानवी अस्तित्वाचे सत्त्व आहे. ते सत्त्व गमावले की माणूस म्हणून जगण्यासारखे व्यक्तीकडे काही राहात नाही. मानसिकदृष्ट्या रुग्ण असलेला समाज जगण्याला पारखा झालेला असतो. अशा समाजाला स्वास्थ्यपूर्ण जगता येत नाही. त्यामुळे समाजाच्या चांगल्या आरोग्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम समजून घेतले पाहिजे. महाराष्ट्र अंनिसचे काम हे देशाच्या मानसिक आरोग्यासाठीचे अभियान आहे, असेही यशवंत मनोहर म्हणाले.