परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षण टीम रोटेशन पद्धतीने? अधिकृत सूचना नाही; शिक्षक संघटनांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 05:58 IST2025-01-21T05:57:45+5:302025-01-21T05:58:02+5:30
Exam News: राज्य मंडळामार्फत दहावी - बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षकांपासून शिपायापर्यंत सर्वांच्या परीक्षा केंद्रांची अदलाबदली करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षण टीम रोटेशन पद्धतीने? अधिकृत सूचना नाही; शिक्षक संघटनांचा विरोध
मुंबई - राज्य मंडळामार्फत दहावी - बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षकांपासून शिपायापर्यंत सर्वांच्या परीक्षा केंद्रांची अदलाबदली करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यावर्षी मार्च २०२५साठी अशा पद्धतीने परीक्षा होणार आहेत, असे विभागीय मंडळाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, मुंबईमधील शिक्षक संघटनांचा याला विरोध होत आहे. याबाबतचे निवेदन मंडळाला दिले आहे.
कॉपीला आळा घालण्यासाठी...
केंद्राच्या अदलाबदलीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेत होणाऱ्या कॉपीला आळा घालण्यासाठी सरकारने प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही अनिवार्य केले आहेत.
परीक्षा काळात संवेदनशील केंद्रांवर करडी नजर ठेवली जाते. मात्र, यातूनही गैरप्रकार झालेले समोर आल्यामुळे यावर्षीपासून बोर्डाने परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि शिपायाची नियुक्तीसुद्धा अन्य शाळा, विद्यालयात केंद्रावर करण्याचा निर्णय घेतला आहे.
निवेदन दिले जाणार
गेल्या दोन वर्षांपासून काही राज्यांमध्ये परीक्षा केंद्रांवर रोटेशनप्रमाणे पर्यवेक्षणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, मुंबईमधील ट्रॅफिक, लोकल प्रवास आणि त्यामुळे दर पेपरच्या वेळी बदलत राहणारा प्रवास या कारणांमुळे ही प्रक्रिया शक्य होईल, असे वाटत नाही.
त्यामुळे हा निर्णय बदलावा, यासाठी शिक्षणमंत्री, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई कार्यालय यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाकडून निवेदन देण्यात येणार आहे.