Join us

पगार थकवला म्हणून सुपरवायझरची हत्या; तीन तासांत आरोपीला अटक, वरळीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 10:42 IST

वरळी पोलिसांनी दोन-तीन तासांत आरोपींना अटक करत अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वरळीमध्ये एसआरएअंतर्गत सुरू असलेल्या बांधकाम साइटवर पगार थकवला तसेच काकांना कामावरून काढल्याच्या रागात एका अल्पवयीनासह तिघांनी चाकूने हल्ला करीत सुपरवायझरची हत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत वरळी पोलिसांनी दोन-तीन तासांत आरोपींना अटक करत अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील डॉ. ई. मोजेस रोडवर कांबळे नगर एसआरए प्रकल्पाच्या ठिकाणी बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. सुभाष नगरमधील रहिवासी असलेले मोहम्मद शब्बीर अब्बास खान (३८) हे येथे सुपरवायझर म्हणून काम करत होते. त्यांनी आपल्या काकांना कामावरून काढले. तसेच ते आपल्याला वेतन देत नाही, याचा राग आरोपी सुधांशू कांबळे (१९) याला होता. याच रागातून कांबळेने खान यांना संपविण्याचा निर्णय घेतला होता. 

भावाच्या तक्रारीवरून पाेलिसांत गुन्हा नोंद

सुधांशू कांबळे याने त्याचा साथीदार साहिल मराठी (१८) आणि एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने बुधवारी मध्यरात्री खान यांच्यावर चाकूने हल्ला करत पळ काढला. 

पोलिसांनी खान यांचा भाऊ मोहम्मद इरशाद (५०) यांची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. 

वरळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपींना अवघ्या तीन तासांत अटक केली आहे.  

 

टॅग्स :गुन्हेगारी