Join us

सुटलं ग्रहण दे दान... देशातील अनेक भागांत दिसले चंद्रग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 8:24 AM

शुक्रवारी रात्री 11.54 मिनिटांनी सुरू झालेले चंद्रग्रहण देशातील अनेक भागांत दिसून आले. देशातील सर्व खगोलप्रेमी नागरिकांना या शतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण (27 जुलै) पाहता आले.

मुंबई - शुक्रवारी रात्री 11.54 मिनिटांनी सुरू झालेले चंद्रग्रहण देशातील अनेक भागांत दिसून आले. देशातील सर्व खगोलप्रेमी नागरिकांना या शतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण (27 जुलै) पाहता आले. मध्यरात्री 2.43 वाजता हे ग्रहण समाप्त झाले. जवळपास 3 तास या चंद्राची खग्रास अवस्था राहिल्याचे दिसून आले. पावसाळी व ढगाळ वातावरणाचा अडथळा दूर झाल्यामुळे हे ग्रहण पाहता आले. यंदाच्या वर्षातील सर्वांत मोठ्या कालावधीचे हे ग्रहण ठरले आहे. 

पृथ्वीच्या सावलीतून चंद्र पूर्णपणे जात असल्याने या ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण म्हटले जाते. या काळात चंद्र हा पृथ्वीपासून दूर जाणार असून त्याचा वेग नेहमीपेक्षा मंदावणार आहे. त्यामुळे यंदाचे ग्रहण हे या शतकातील मोठे ग्रहण असणार आहे. यानंतर पुन्हा 9 जून 2123 मध्ये असे ग्रहण अनुभवयास मिळेल. जुलै महिन्यामध्ये सूर्य हा पृथ्वीपासून दूर अंतरावर असतो. त्यामुळे पृथ्वीची लांबलचक सावली पडत असते. या ग्रहणादरम्यान चंद्र या सावलीतून जात असल्याने हे ग्रहण पाहायला मिळते. चंद्र पृथ्वीपासून लांब गेल्याने त्याचा छोटा आकार, त्याचा मंदावलेला वेग आणि पृथ्वीची मोठी सावली या तीन प्रमुख कारणांमुळे हे ग्रहण निर्माण होते. काल मध्यरात्री झालेले खग्रास चंद्रग्रहण हे ‘सारोस’ चक्रातील 129 वे ग्रहण आहे. या आधीचे सर्वांत मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण 16 जुलै 2000 या दिवशी झाले होते. योगायोग म्हणजे दोन्हीही ग्रहणे एकाच सारोस चक्रातील आहेत. पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातील जवळपास सर्वच खंडांतून (युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व दक्षिण अमेरिका) हे ग्रहण पाहायला मिळणार आहे. संपूर्ण भारतातून ग्रहणाच्या सर्व स्थिती पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :चंद्रग्रहण 2018