Join us

पुरवणी परीक्षा : मुंबईचा दहावीचा निकाल २९.८८, तर बारावीचा १६.४२ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 1:30 AM

Exam Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेत २२,७०० विद्यार्थ्यांपैकी केवळ ३,७२८ म्हणजे १६.४२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

मुंबई : राज्य मंडळाने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मुंबई विभागाचा बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल १६.४२ टक्के तर दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल २९.८८ टक्के लागला. बारावीच्या निकालात मागील २ वर्षांपेक्षा घट झाल्याचे तर दहावीच्या निकालात वाढ झाल्याचे दिसून आले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेत २२,७०० विद्यार्थ्यांपैकी केवळ ३,७२८ म्हणजे १६.४२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २०१८ साली बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल १९.२७ टक्के तर २०१९ साली १९.१२ टक्के लागला होता. यंदा यात २.७ टक्के घट दिसून आली.दुसरीकडे दहावीची पुरवणी परीक्षा दिलेल्या १२,६४६ विद्यार्थ्यांपैकी ३,७७९ म्हणजे २९.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २०१८ साली ही टक्केवारी १४.२१ तर २०१९ साली १४.४१ इतकी होती. यंदा यात १५.४ टक्के वाढ झाली.

राज्यात अकरावी प्रवेशासाठी १९ हजार विद्यार्थी पात्रराज्यात दहावी पुरवणी परीक्षा देऊन एक किंवा दोन विषयांत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १९ हजार ८१२ इतकी आहे. हे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये एटीकेटी सवलीतद्वारे इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी पात्र ठरतील.

उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती व पुनर्मूल्यांकन अर्जऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येतील. दहावीसाठी https://verification.mh-ssc.ac.in आणि बारावीसाठी https://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर सर्व माहिती व सूचना देण्यात आल्या आहेत. 

गुण पडताळणीसाठी २४ डिसेंबर ते २ जानेवारी २१पर्यंत ५० रुपये शुल्क ऑनलाइन भरून अर्ज करता येतील. तर उत्तरपत्रिककांच्या छायांकित प्रतीसाठी २४ डिसेंबर ते १२ जानेवारीपर्यंत ऑनलाइन ४०० रुपये भरून अर्ज करता येईल.

टॅग्स :परीक्षाशिक्षण