Join us

श्वानदंश लसीसाठी मिळेना पुरवठादार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 4:51 AM

हाफकिन संस्थेमुळे मिळाल्या ९० हजार लस : महापालिका करणार दोन कोटी रूपये खर्च

मुंबई : भटक्या श्वानाने चावा घेतल्यानंतर रुग्णांना श्वानदंश लस तातडीने देणे आवश्यक असते. मुंबईतील अशा १०१ श्वानदंश लसीकरण केंद्रांत मासिक १५ हजार लसची आवश्यकता असते. २०१९ ते २०२१ या दोन वर्षांसाठी ही लस खरेदी करण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेला दोनवेळा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र ही लस जीवनावश्यक औषध प्रकारात येत असल्यामुळे महापालिका अखेर परळ येथील शासनमान्य हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ९० हजार लस खरेदी करीत आहे.२०१४ च्या गणनेनुसार मुंबईत भटक्या श्वानांची संख्या ९५ हजार १७२ इतकी होती. २०१४ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सात अशासकीय संस्थांमार्फत ८९ हजार २९९ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले.या संस्थांवर पालिकेकडून आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र निर्बीजीकरणावर खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये वाया जात असल्याची तक्रार स्थायी समिती सदस्यांनी गेल्या बैठकीत केली होती. तसेच श्वानदंशाच्या लसींचाही तुटवडा असल्याची नाराजी सदस्यांनी व्यक्त केली होती.मात्र पुरवठादार मिळत नसल्यामुळे पालिकेने आता हाफकिन संस्थेकडून लस घेण्यास सुरुवात केली आहे. आॅक्टोबर २०१९ ते मार्च २०२० या कालावधीमध्ये या संस्थेकडून ९० हजार लस खरेदी करण्यात येणार आहेत.प्रति लस २३१ रुपये पालिकेला आकारण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण दोन कोटी सात लाख ९० हजार रुपये पालिका या लसीसाठी खर्च करणार आहे. यापैकी पालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारात ४९ लाख ८९ हजार ६०० रुपये सदर संस्थेला आगाऊ दिले आहेत. तर उर्वरित एक कोटी ५८ लाख ४०० रुपये अदा करण्यासाठी प्रशासनाने स्थायी समितीची परवानगी मागितली आहे.