लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्राला २०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा करावा, अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्र पाठवून केली आहे.
१६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचीदेखील आवश्यकता भासत आहे. अशावेळी दोन मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन आणि लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी १० टँकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत, असे कुंटे यांनी या पत्रात म्हटले आहे. वाढीव ऑक्सिजनसाठी केंद्राकडे मागणी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले होते. यापूर्वी नेमून दिलेले ओदिशा येथील आरआयएनएल, विझाग आणि जिंदाल स्टिल येथील ऑक्सिजन उपलब्धतेचे नियोजन कागदावरच आहे. सध्या गुजरात जामनगर येथून दिवसाला १२५ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा होत असून, त्यात १०० मेट्रिक टनाने वाढ करून दिवसाला २२५ मेट्रिक टन आणि भिलाई येथून २३० मेट्रिक टन पुरवठा व्हावा, अशी विनंतीही मुख्य सचिवांनी केली आहे.
लिक्विड ऑक्सिजन वाहतुकीसाठी सिंगापूर, दुबई व अन्य देशांतील तेल उत्पादक कंपन्यांकडून केंद्र शासनाला आयएसओ टँकर्स मिळाले आहेत. त्यातील दहा टँकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत, असेही मुख्य सचिवांनी या पत्रात म्हटले आहे.