मुंबई : मुंबईत ताडी बनविण्यास ‘क्लोरल हायड्रेट’ या विषारी रसायनाचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. शहरात असलेल्या २५० दुकानांत याचा पुरवठा करणारा सराईत गुन्हेगार व्यंकट रामणय्या शंकरय्या करबुय्या (४६) याच्यासह त्याच्या अन्य दोन साथीदारांसह आरे परिसरातून बुधवारी रात्री अटक करण्यात आली. गोडाउन मॅनेजर बुनियाद अहमद गुलाम रसुल अन्सारी (५५) आणि राजन्न व्यंकन्न बुरपसू (४५) अशी व्यंकटासोबत अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
आरे परिसरात काही घातक केमिकल्सची तस्करी सुरू असून, त्याचा मोठ्या प्रमाणात साठा एका गोडाउनमध्ये करण्यात आल्याची माहिती खार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त परमजीत सिंग दहीया, तसेच खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना सांगितले. परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनाही याबाबत माहिती देण्यात आली.
पश्चिम विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, तसेच राठोड आणि दहीया यांच्या मार्गदर्शनाखाली नायक यांनी आरे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ, पोलीस निरीक्षक विनोद पाटील आणि पथकाच्या मदतीने आरे परिसरात युनिट क्रमांक १ जवळ असलेल्या गोडाउनमध्ये धाड टाकत अन्सारीला ताब्यात घेतले. त्या ठिकाणी २,१८४ किलो ‘क्लोरल हायड्रेट’ असलेल्या७८ गोणी पोलीस पथकाला सापडल्या. अन्सारीच्या चौकशीत त्याने व्यंकटबाबत पोलिसांना माहिती देत, तो युनिट ३१ मध्ये राहत असल्याचे उघड केले. तेव्हा नायक यांनी व्यंकटलाही त्याच्या घराजवळून ताब्यात घेतले. त्याच्याकडेही त्याच केमिकलच्या २ गोण्या सापडल्या. अशाप्रकारे एकूण ८० गोण्यांमध्ये ४५ लाख ३४ हजार ३०० रुपयांचे क्लोरल हायड्रेट पकडण्यात आले. मुंबईत असलेल्या जवळपास २५० ताडीविक्री केंद्रात व्यंकट हे केमिकल्स पुरवत होता, अशी माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. त्यामुळे मुंबईभरात व्यंकटच्या टोळीचे लोक पसरल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे.
‘क्लोरल हायड्रेट’ का घातक?क्लोरल हायड्रेटमुळे मळमळणे, चक्कर येऊन तोल जाणे, उलटी होणे किंवा अनेकदा तर याच्या अधिक वापरामुळे शुद्धदेखील हरपू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. याच्या सेवनाने मेंदू आणि स्नायूंच्या हालचालींतील सुसूत्रता कमी होते. झोपताना या रसायनाचे सेवन केल्यास त्याचा परिणाम दुसºया दिवशी दिसून येता. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या व्यवसायिक कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच भारतासह विदेशातही याच्या वापरावर बंदी आहे.