बुरखाधारी महिलेकडून ड्रग्जचा पुरवठा, बेरोजगार तरुणांना टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:53 AM2018-04-17T01:53:00+5:302018-04-17T01:53:00+5:30

राजस्थान ड्रग्ज तस्करीत मुंबईतील बुरखाधारी महिलेचा सहभाग उघडकीस आला आहे. राजस्थानमधून मुंबईत तस्करीसाठी आणलेले ड्रग्ज तिच्याकडे सोपविण्यात येत होते. पुढे तेच उच्च दर्जाच्या ड्रग्जमध्ये भेसळ करत, ते बाजारात पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे.

 Supply of Drugs from the Burkha Woman, Target for the unemployed youth | बुरखाधारी महिलेकडून ड्रग्जचा पुरवठा, बेरोजगार तरुणांना टार्गेट

बुरखाधारी महिलेकडून ड्रग्जचा पुरवठा, बेरोजगार तरुणांना टार्गेट

Next

मुंबई : राजस्थान ड्रग्ज तस्करीत मुंबईतील बुरखाधारी महिलेचा सहभाग उघडकीस आला आहे. राजस्थानमधून मुंबईत तस्करीसाठी आणलेले ड्रग्ज तिच्याकडे सोपविण्यात येत होते. पुढे तेच उच्च दर्जाच्या ड्रग्जमध्ये भेसळ करत, ते बाजारात पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एका डिलिव्हरीमागे वितरकाला २५ हजार रुपये मिळत असल्याची माहितीही, हेरॉईन तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मंगीलाल काजोडमल मेघलाल (४०) याच्या चौकशीतून उघड झाली
आहे. न्यायालयाने त्याला १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मूळचा राजस्थानचा रहिवासी असलेला मंगीलाल दहावी नापास आहे. त्याच्या आईचे निधन झाले असून, तो वडिलांसोबत राहतो. या तस्करीत तो माल पोहोचविण्याचे काम करतो. राजस्थानमधील व्यक्ती त्याच्या हातात ड्रग्जचा साठा देऊन, त्याला रेल्वे अथवा बसचे तिकीट काढून पाठवून देत असे. यात एका डिलिव्हरीमागे मंगीलालला २० ते २५ हजार रुपये मिळायचे. त्यात जेवण आणि राहण्याच्या खर्चासाठी ५ हजार रुपये वेगळे मिळत होते. याच आमिषाला बळी पडून मंगीलालने आतापर्यंत मुंबईत अनेक वेळा ड्रग्ज पुरविण्याचे काम केले आहे.
आतापर्यंत सहा वेळा तो मुंबईत आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, त्याच्याकडील माहितीतून त्याने जास्त वेळा मुंबई दौरा केल्याचा संशय अमली पदार्थ विरोधी पथकला (एएनसी) आहे. एएनसीचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत.
मुंबईत आल्यानंतर एका अनोळखी क्रमांकावरून एका महिलेचा त्याला फोन येत असे. महिलेने सांगितल्याप्रमाणे, कधी बोरीवली, सांताक्रुझ, ग्रँटरोड परिसरात तो ड्रग्जचा साठा घेऊन जात असे. तेथेही महिला पुढे येत नव्हती. टॅक्सीचालक अथवा रिक्षावालाकडे ती माल द्यायला सांगत होती. फक्त दोन कॉलमध्ये त्यांचे संभाषण पूर्ण होत असे.
डिलिव्हरी मिळताच त्याला राजस्थानकडील व्यक्तीकडून पैसे मिळत असल्याची माहिती मंगीलालने पोलिसांना दिली आहे. या माहितीच्या आधारे एएनसीच्या पथकाने टॅक्सीचालक, रिक्षाचालकांची धरपकड सुरू केली. तेव्हा त्यांच्या चौकशीतून महिला ही नेहमी बुरख्यातच त्यांच्याशी संभाषण करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिचा चेहरा कोणीही पाहिलेला नाही. मात्र, तिचा आवाज ते ओळखत होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सांताक्रुझ, ग्रँटरोड या ठिकाणी छापे टाकले. मात्र, महिला सापडली नाही. तिच्या शोधासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.

राजस्थानमध्ये कैलास जैनचा शोध
राजस्थानमधून कैलास जैन हा ड्रग्जचा पुरवठा या तरुणांकडे करत असल्याची माहिती एएनसीच्या पथकाला मिळाली आहे. त्यानुसार, एएनसीचे पथक तेथे ८ दिवस तळ ठोकून होते. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यांनी जैनच्या घरीही छापा टाकला. मात्र, तो पसार झाला. त्याच्या चौकशीतून एक मोठ्या साखळीचा पर्दाफाश होण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांना आहे. त्यानुसार, अधिक तपास सुरू आहे.

सीमेच्या पलीकडून की शेतीआड? राजस्थानमध्ये बरेचसे व्यापारी हे ड्रग्जच्या तस्करीत
गुंतल्याचे समोर येत आहे. मंगीलालकडून जप्त करण्यात आलेले हेरॉईन हे उच्च दर्जाचे आहे. तो सीमेच्या पलीकडून आणण्यात आले होते की, येथीलच कोटा या भागातून आणण्यात आले होते, याबाबत अधिक तपास सुरू आहे.
कोटा भागात काही ठिकाणी अधिकृत ड्रग्ज शेतीधारकांच्या गोदामातून ड्रग्जची हेराफेरी करून ही मंडळी ते मुंबईत पुरवत असल्याचाही संशय वर्तविण्यात येत आहे.

Web Title:  Supply of Drugs from the Burkha Woman, Target for the unemployed youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.