Join us

काेराेना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण जास्त असणाऱ्या जिल्ह्यांना अधिक लसींचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात ज्या जिल्ह्यात काेराेना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण जास्त आहे, तेथे लक्ष केंद्रित करण्याची सूचना नुकत्याच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात ज्या जिल्ह्यात काेराेना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण जास्त आहे, तेथे लक्ष केंद्रित करण्याची सूचना नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर अशा जिल्ह्यांत कंटेन्मेंट झोन्सची सक्ती आणि मुख्यतः लसीचा अधिकचा साठा द्यावा असेही आदेश दिले. जेणेकरून लसीकरण प्रक्रियेला वेग येऊन संसर्ग नियंत्रणासाठी जाेमाने प्रयत्न करता येतील.

राज्यात औरंगाबाद, अकोला, नंदुरबार, नाशिक, पुणे, बुलडाणा, वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १५ टक्क्यांहून अधिक आहे. औरंगाबादमध्ये ते २४.४ टक्के असून, रुग्णवाढीची अत्यंत धोकादायक स्थिती उद्भवली आहे, तर अकोला, नंदुरबारमध्ये ते अनुक्रमे २२.६ टक्के आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अभ्यासानुसार, या महिनाअखेरपर्यंत काेराेनाची दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारांपर्यंत पोहोचेल.

याविषयी, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, पॉझिटिव्हिटीचे प्रमाण अधिक असलेल्या जिल्ह्यांत कठोर निर्बंध लावणे गरजेचे आहे. सध्या राज्याचे पाॅझिटिव्हिटीचे प्रमाण १०.९ टक्के आहे. राज्याच्या पॉझिटिव्हिटी प्रमाणाच्या तुलनेत राज्यातील १६ जिल्ह्यांत हे प्रमाण अधिक आहे. काही जिल्ह्यांत मृत्युदरही अधिक असून, त्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमातील गर्दीवर निर्बंध लावणे गरजेचे आहे. सांगली, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, उस्मानाबाद आणि सातारा या जिल्ह्यांत मृत्यूचे प्रमाण तीन टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये अतिजोखमीच्या संपर्कांचा शोध घेण्यावर भर देणे, चाचण्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. दरम्यान, राज्यातील मृत्यूचे प्रमाण डिसेंबर महिन्यात २.१९ टक्के होते. फेब्रुवारीत ते ०.८३ टक्क्यांवर आल्याचे दिलासादायक चित्र आहे.

........................