- गौरी टेंबकर-कलगुटकरमुंबई : मालाडच्या शिधावाटप दुकानातून खरेदी केलेले धान्य अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असून त्यात मोठ्या प्रमाणात टोके तसेच किडे सापडले आहेत. मालवणीच्या गेट क्रमांक ८ येथे असलेल्या शिधावाटप दुकानात हा धक्कादायक प्रकार घडला असून या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ कार्डधारकाने काढून तो ‘लोकमत’ला पाठवला आहे. माणूस काय तर जनावरेही खाणार नाहीत अशा दर्जाचे धान्य पुरविले जात असल्याचा कार्डधारकांचा आरोप असून याप्रकरणी संबंधित दुकानदारावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.मालवणीच्या गेट क्रमांक ८ वर ४२ग२९८ हे शिधावाटप दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी नारंगी रेशनकार्डधारक विशाल सातोसकर हे त्या ठिकाणी धान्य घेण्यास गेले. मात्र जे धान्य त्यांना देण्यात आले त्यामध्ये किड्यांची मोठमोठी घरटी होती. तसेच हे धान्य जसे दुकानदाराने त्यांच्या पिशवीत ओतले तसे ते टोके पिशवीतून बाहेर पडू लागले. त्यामुळे त्यांनी लागलीच मोबाइलमध्ये या सगळा प्रकार कैद केला आणि नंतर ‘लोकमत’ला तो व्हिडीओ पाठविण्यात आला. सातोसकर हे एका गॅरेजमध्ये काम करतात.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनदरम्यानही या दुकानात माणशी धान्य न देता एक किंवा दोन माणसांचे धान्य कमी दिले जात होते. याबाबत अजूनही काही स्थानिकांच्या तक्रारी आहेत. मालाड विभागात राठोडीतील दुकानानंतर ही दुसरी अशी तक्रार आहे ज्यात दुकानदार हा कार्डधारकांची अशा प्रकारे फसवणूक करत आहे. निकृष्ठ दर्जाचे धान्य लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. कोरोनाशी लढताना निकृष्ठ अन्न खाऊन आजारी पडल्यास आम्हाला रुग्णालयाचा खर्चही परवडणारा नाही. त्यामुळे अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या दुकानदारावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.मात्र याबाबत मालाडचे शिधावाटप अधिकारी सचिन झेले यांना फोन आणि एसएमएसमार्फत संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.- मालाड विभागात राठोडीतील दुकानानंतर ही दुसरी अशी तक्रार आहे, ज्यात दुकानदार हा कार्डधारकांची अशा प्रकारे फसवणूक करत आहे. निकृष्ठ दर्जाचे धान्य लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.'मी संबंधित दुकानातून दोन दिवसांपूर्वी घेतलेले धान्य अजूनही वापरलेले नाही. ते पावसात भिजलेले असून टोक्यांनी अर्धेअधिक खाल्लेले आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालत योग्य ती कायदेशीर पावले उचलावीत.- विशाल सातोसकर,तक्रारदार
जनावरेही खाणार नाहीत अशा धान्याचा पुरवठा!, मालाडच्या ‘४२ग२९८’ दुकानातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 7:10 AM