दुधासह कांदा-बटाटा आणि भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत; किरकोळ विक्रेत्यांकडे थेट भाजीपाला पोहचविण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 03:34 PM2020-04-04T15:34:27+5:302020-04-04T15:35:09+5:30
भाजीपाला, फळे, कांदे-बटाटे आदींचा पुरवठा झाल्याचा दावा राज्य शासनाने केला.
मुंबई : राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पुरेशा प्रमाणात भाजीपाला, फळे, कांदे-बटाटे आदींचा पुरवठा झाल्याचा दावा राज्य शासनाने केला आहे. मुंबई, पुणे अशा महानगरांमध्ये मार्केट यार्डांसोबतच शेतकरी गटांमार्फत किरकोळ विक्रेत्यांकडे थेट भाजीपाला पोहचवण्यात येत असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.
प्रमुख शहरांसोबत इतरत्रही विनाव्यत्यय भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येत आहे. भाजीपाल्याचा तुटवडा होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. शेतकरी गटामार्फत थेट मुंबई उपनगरातील किरकोळ विक्रेत्यांकडे भाजीपाला पोच करण्यात आला आहे. मुंबई शहरामध्ये भाजीपाला पुरवठा सुरळीत सुरू असून भाजी मार्केटमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी महापालिकेच्या वतीने सोशल डिस्टन्सिंगची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच भाजीपाल्याचा किमती नियंत्रणात ठेवण्यात येत आहेत.
एपीएमसी मार्केटअंतर्गत येणाऱ्या धान्य बाजारावरही बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. भाजीपाला व धान्याच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसात दूध, दही, पनीर, ताक, लस्सी या दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा होण्यात अडचणी येत होत्या. मात्र, पोलीस विभागाच्या सहकार्याने या अडचणी सोडविण्यात आल्या असून दुग्धजन्य पदार्थांचा सुरळीत करण्यात सुरुवात झाली आहे. अमूल, चितळे, गोकुळ, प्रभात, गोवर्धन इत्यादी महत्त्वाच्या कंपन्यांचे दुध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादने ही दुकाने व किरकोळ विक्रेत्यांकडे पोहचण्यास सुरूवात झाली असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले.
प्रमुख शहरातील शुक्रवारचा पुरवठा
वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)मध्ये ११४ ट्रक व टेम्पोमधून भाजीपाला व कांदा-बटाटा यांची थेट आवक झाली आहे. त्याचबरोबर १७५ वाहनांनी थेट मुंबई शहर व उपनगरामध्ये भाजीपाला व फळे पोचविण्यात आली आहेत. मुंबई उपनगर भागातील किरकोळ विक्रेत्यांकडे विविध १९४ शेतकरी गटांमार्फत थेट भाजीपाला पोचविण्यात आला आहे.
पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात काल २८५ वाहनातून एकूण १० हजार टन कांदा व बटाट्याची आवक झाली आहे. तसेच पुण्यातील एपीएमसीच्या मुख्य यार्डाबरोबरच मांजरी व खडकी येथील उप यार्डात २३५ वाहनातून एकूण ७ हजार ९०० क्विंटल ताजे भाजीपाला व फळांची आवक झाली आहे.
नागपूरमधील कळमना येथील मुख्य बाजार पेठेत ५९ ट्रक/टेम्पोच्या माध्यमातून ४ हजार ९६५ क्विंटल भाजीपाला व फळांची आवक झाली असून यामध्ये भाजीपाला, कांदा, बटाटा, लसूण यांच्यासह विविध फळांचा समावेश आहे.