Join us

चारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 2:16 AM

रहिवासी आजारांनी त्रस्त : गेल्या ४० दिवसांपासून यंत्रणेचे दुर्लक्ष

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील चारकोप सेक्टर आठ येथील रहिवाशांना सुमारे ४० दिवसांपासून गढूळ पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे कित्येक रहिवाशांना या दुषित पाण्यामुळे ताप, जुलाब, उलटी या आजाराने त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका दुषित पाण्याकडे लक्ष देत नसल्याची खंत चारकोपकरांनी व्यक्त केली.

स्थानिक नगरसेविका संध्या दोशी यांनी यासंदर्भात सांगितले की, चारकोप सेक्टर आठमध्ये ४५ दिवसांपासून गढूळ पाण्याची समस्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या माध्यमातून नवीन पाण्याची पाइपलाइनची जोडणी केली. तसेच कुठेतरी सांडपाण्याच्या पाइपलाइनची गळती होत आहे. गळती झालेल्या सांडपाण्याच्या पाइपलाइनची दुरूस्तीचे काम सुरू आहे. महापालिकेच्यावतीने दररोज रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचे दोन टँकर पुरविले जातात. पावसाळ्यामध्ये साथीचे रोग पसरतात. परंतु कोणताही आजार झाला; तर तो दुषित पाण्यामुळे झाला आहे, अशा प्रकारची दिशाभूल चारकोप परिसरात केली जात आहे.

चारकोपमधील म्हाडाची वसाहत ही २५ वर्षांपूर्वीची आहे. त्यावेळी पिण्याच्या पाण्याची आणि सांडपाण्याची पाइपलाइन एकत्र जोडण्यात आली. त्यामुळे सांडपाण्याच्या पाइपलाइनची गळती होत असून ते पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळत आहे. म्हणून रहिवाशांना गढूळ पाणी पुरवठा होतोय. चारकोपमधील म्हाडा वसाहत हा खूप मोठा परिसर आहे. त्यामुळे त्वरीत पाण्याची व सांडपाण्याची पाइपलाइन बदलणे शक्य नाही. तरीही नवीन पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम लवकरच हाती घेतले जाईल, असे भाष्य संध्या दोशी यांनी केले.

चारकोप सेक्टर ८ मधील परिसरात १९ सोसायट्या आहेत. प्रत्येकी एका सोसायटीमध्ये ५० घरे आहेत. या घरांना दुषित पाण्याचा फटका बसला आहे. दुषित पाण्यामुळे काही रहिवासी आजारी पडले. मी स्वत: दुषित पाणी पिऊन पाच दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहे. माझा चेहरा दुषित पाणी प्यायल्यामुळे लालबुंंद झाला आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये सांडपाणी मिसळत असून पाण्याला दुर्गंधी येत आहे. - किशोर दळवी, स्थानिक रहिवासी

टॅग्स :पाणी