मुंबई : जातीभेदाच्या द्वेषातून बाबासाहेब पुरंदरेंना विरोध करणे ही दुर्दैवी बाब आहे. पुरंदरेंनी हिंदुत्ववादी शिवाजी रंगवले असे म्हणणे चुकीचे आहे. बाबासाहेबांचा सन्मान हा मराठी मातीचा सन्मान असल्याचे मत ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केले. महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून खडाजंगी रंगत असताना या वादात पाटील यांनी उडी घेतली आहे. सरकारच्या सांगण्यावरून नव्हे, तर एक साहित्यिक म्हणून मी ही पत्रकार परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले.तथाकथित राजकीय नेते आज गप्प बसले आहे. आज महाराष्ट्र जातीद्वेषाच्या विषारी विळख्यामागे गुरफटून जात आहे. एक शिवप्रेमी म्हणून मला याचे दु:ख वाटते. आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सातारच्या महाराणी सुमित्रा राजे भोसले यांनी बाबासाहेबांना लोकांच्या पुढे सादर केले. त्यांच्याकडून शिवचरित्र वाचून घेतले. महाराणी या स्वत: इतिहास संशोधक होत्या. जर बाबासाहेबांचे लेखन जातीय द्वेष निर्माण करणारे वाटले असते, तर त्यांनी ते ऐकले असते का, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.इतिहासकार, संशोधक असा टेंभा बाबासाहेबांनी कधीच मिरवला नाही. या पुरस्काराला विरोध करणे म्हणजे तमाम दुर्गप्रेमी, शिवप्रेमी गिर्यारोहकांच्या तरुण पिढ्यांचा अपमान आहे. बाबासाहेब केवळ ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना टार्गेट हे सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारे नाही. जेम्स लेनच्या लिखाणाला पुरंदरेंची मदत स्पष्ट नसल्याचे करीत लेनची गाढवावरून धिंड काढली पाहिजे, असे पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)
बाबासाहेबांना पाठिंबा
By admin | Published: August 19, 2015 2:31 AM