‘त्यांना’ आधार मित्रांचा

By Admin | Published: May 15, 2016 04:18 AM2016-05-15T04:18:47+5:302016-05-15T04:18:47+5:30

घर हे चार भिंतीने नव्हे, तर त्या घरातील माणसे, त्यांच्यातील प्रेम, जिव्हाळा यातूनच त्या घराला घरपण येत असते. आजी, आजोबा, आई, बाबा, मुले असे हे कुटुंब तयार होते

'Support' friends for them | ‘त्यांना’ आधार मित्रांचा

‘त्यांना’ आधार मित्रांचा

googlenewsNext

मुंबई : घर हे चार भिंतीने नव्हे, तर त्या घरातील माणसे, त्यांच्यातील प्रेम, जिव्हाळा यातूनच त्या घराला घरपण येत असते. आजी, आजोबा, आई, बाबा, मुले असे हे कुटुंब तयार होते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये विभक्त कुटुंबपद्धती आणि आता त्यातही परदेशी रवाना होणाऱ्या मुलांची संख्या वाढल्याने घराचे घरपण आणि कुटुंबाचे अस्तित्वच पुसट होत आहे. अशा अनेक एकट्या दाम्पत्यांसाठी मित्रपरिवारच जगण्याचा आधार ठरत आहेत. यातूनच मित्र परिवाराचा कुटुंब या संकल्पनेत प्रवेश होताना दिसत असल्याचे जागतिक कुटुंब दिनी तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.
‘कुटुंब म्हणजे, आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकू, भावंडे इतकाच मर्यादित विचार १५ ते २० वर्षांपर्यंत होता, पण काळाच्या गरजेनुसार कुटुंब या संकल्पनेची व्याप्ती वाढत चालली आहे. कुटुंब म्हणजे, एकाच घरात राहणारे हा निकषदेखील आता लागू होत नाही. कारण कुटुंबात शेजारचे, कार्यालयातील सहकर्मचारी, मित्रमंडळी यांचा समावेश झाला आहे,’ असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रवी अभ्यंकर यांनी मांडले.
डॉ. अभ्यंकर यांनी सांगितले की, ‘पूर्वीच्या काळात मुलगा आठ वर्षांचा झाला की, त्याला शिक्षणासाठी गुरुकुलमध्ये पाठवले जायचे. आता मुले १२ वी झाल्यावर उच्चशिक्षणासाठी किंवा उच्चशिक्षण घेतल्यावर नोकरीसाठी घराबाहेर पडतात. त्यानंतर, अनेक जण त्याच ठिकाणी स्थायिक होतात. आता विभक्त कुटुंब पद्धतीतही बदल झाला आहे, पण काळानुरूप अनेक बदल सर्वांनी स्वीकारले आहेत. त्याप्रमाणे, हा बदल पालकांनी स्वीकारला पाहिजे. मुले मोठी झाल्यावर त्यांचे स्वतंत्र आयुष्य सुरू होते. करिअरसाठी पालकच मुलांना लहानपणापासून प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे पाल्य दूर जाणार याची मानसिक तयारी ठेवली पाहिजे.’
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले, ‘गेल्या १५ ते २० वर्षांत ‘फॅमिली कौन्सिलिंग’चे प्रमाण वाढले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती आणि त्यापुढे जाऊन ‘अल्ट्रा न्यूक्लियर’ कुटुंब पद्धती सध्या रुजत आहे.
मुले परदेशात गेल्यावर मुलांपेक्षा त्यांच्या आई-वडिलांनाच जास्त एकाकीपणा येतो. अनेकदा मुले परदेशात अथवा दुसऱ्या शहरात गेल्यावर त्यांच्या व्यापात असतात. नवीन गोष्टी शिकत, अनुभवत असतात, पण पालक मात्र घरी एकटेच असतात. त्यामुळे त्यांना अधिक ताण येतो. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला हवा.’ अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इंटरनेटच्या वापरामुळे संवाद साधणे सहज सोपे झाले आहे. पालकांना मुले लांब असली, तरीही पाहायला मिळतात, त्यांच्याशी संवाद साधता येतो, पण प्रत्यक्ष संवाद, सहवासातून मिळणारा आनंद, आपुलकी यात कुठेतरी कमी होते. त्यामुळे ताणतणावाच्या घटना वाढताना दिसत आहेत. पूर्वी कुटुंबातील मोठ्या व्यक्ती मुलांवर कळत-नकळतपणे संस्कार करायच्या. लहान मुले बघून अनेक गोष्टी शिकत असतात. एकत्र कुटुंबपद्धती अथवा विभक्त कुटुंब पद्धतीत घरातील मोठ्या मंडळींचे निरीक्षण करून शिकायच्या, पण आता मुलांना हा अनुभव येत नाही. (प्रतिनिधी)

Web Title: 'Support' friends for them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.