Join us

केरळ पूरग्रस्तांसाठी मुंबईकरांची सढळ हस्ते मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 2:45 AM

जिओ संघटनेची एक कोटीची मदत

मुंबई : केरळ येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गिरगाव, ग्रॅन्ट रोड येथील नेपियन सी रोड परिसरातील शिवाजीनगर, जय प्रकाश नगर या ठिकाणांहून टीम परिवर्तन आणि टीम सेवक यांच्या वतीने खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापरातील वस्तू केरळकडे रवाना केल्या आहेत. २० आणि २३ आॅगस्टपासून खाद्यपदार्थ गोळा करण्यास टीमने सुरुवात केली होती. आता शनिवारी केरळकडे सर्व सामग्री रेल्वेमार्फत पाठविण्यात येणार आहे.गिरगाव आणि ग्रॅन्ट रोड या भागातील नागरिकांनी आणि येथे राहणाऱ्या लोकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला असल्याचे असल्याचे स्वयंसेवक तुषार वरंग यांनी सांगितले. १४० किलो तांदूळ, २५ किलो तुरडाळ, ५ किलो मूगडाळ आणि मसूरडाळ, १२ किलो साखर, दीड किलो चहा पावडर, बिस्किटांचे १ हजार पॅकेट, टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, न्यूडल्स पॅकेट इत्यादी साम्रगी केरळकडे रवाना करण्यात येणार आहे. दरम्यान, सायन कोळीवाडा या भागातील लोकप्रतिनिधी कॅप्टन आर. तमील सेल्वन यांनी मागील चार दिवसांत केरळमध्ये जाऊन मदत कार्य केले आहे. बंबा नदीच्या किनारी असलेल्या मंगलम या भागात केळी, बिस्कीट, पाणी व दैनंदिन वापरातील वस्तूची मदत केली.स्टुडण्ट्स इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडिया (एसआयओ)च्या वतीने, केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातील विविध मशिदी आणि इदगाहमधून तीन लाख रुपयांचा निधी गोळा करण्यात आला. संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आर्थिक मदत गोळा करण्याच्या उद्देशाने देश पातळीवर विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. संघटनेचे केरळ स्थानिक शाखेचे कार्यकर्ते इतर स्वयंसेवकांसोबत मिळून पूरग्रस्त भागात मदत कार्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत आहेत. सध्या पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू, आरोग्यविषयक सुविधा, तसेच पूरग्रस्तांसाठी निवारे इत्यादी बाबींच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जात आहे, अशी माहिती संघटनेच्या दक्षिण विभागाचे सचिव राफिद शहाब यांनी दिली.केरळमधील पूरग्रस्तांसाठी जैन समाज आणि जैन इंटरनॅशनल आर्गनायझेशन (जिओ) ने पुढाकार घेतला आहे. जिओ संस्थेने ५१ लाखांचा धनादेश आणि ५० लाखांची मदत सामग्री केरळला रवाना केली. एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपुर्द करण्यात आला तसेच मदत साहित्याने भरलेले पाच ट्रक केरळला पाठविण्यात आले. ताडदेव येथे झालेल्या कार्यक्रमात जैन संत नयपद्म सागर महाराज यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मदत साहित्य नेणाºया ट्रकला हिरवा झेंडा दाखविला. या मदत सामग्रीच्या पहिल्या खेपेत पूरग्रस्तांसाठी औषधे, भांडी, पांघरूण असे गरजेचे सामान पाठवण्यात आले. जैन समाजाची संस्था ‘जिओ’च्या डॉक्टर फेडरेशनची टीम केरळमध्ये वैद्यकीय मदतीसाठी पाठवण्याची घोषणाही संघटनेने केली आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, संस्कार आपले सर्वांत मोठे धन आहे. हे संस्कारच आपल्याला सेवेची प्रेरणा देतात. त्या संस्कारांनी समृद्ध असलेला जैन समाज नेहमी संकटाच्या वेळी लोकांसोबत उभा होत असतो. या प्रसंगी आमदार मंगल प्रभात लोढ़ा यांच्यासह आमदार राज के. पुरोहित, नगरसेवक अतुल शाह, माजी महापौर मीरा भायंदर, गीता जैन, ए.के. संघवी, पृथ्वीराज कोठारी, वीरेंद्रभाई शाह, बाबूलाल बोहरा, आशीष शाह, घेवर चंद बोहरा, हीरालाल संघवी, बाबूलाल वर्धन, नवीन मेहता, सुरेश बाफना, अम्बर कानूनगो, शैलेष वर्धन, ‘जिओ’चे पदाधिकारी व जैन समाजातील अनेक सामाजिक संस्था जैन संघांशी संबंधित लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :केरळ पूरमुंबई