लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रीय सेवा दल, राजद, जनता दल युनायटेड यांच्यासह २१ समाजवादी पक्ष आणि संघटनांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. आमचे विचार वेगळे होते. पण लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही आमच्यातील मतभेद संपवून एकत्र आलो आहोत. प्रवाहाविरोधात उडी मारली आहे. आता प्रवाहात ताकद असेल तर आम्हाला थांबवून दाखवावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपला दिले.
आमदार कपिल पाटील यांच्या पुढाकाराने राज्यातील २१ हून अधिक समाजवादी राजकीय पक्ष आणि संघटनांची एकत्रित बैठक वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव यांचा महात्मा फुले पगडी आणि घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला.
हुकूमशाही संपविण्यासाठी एकत्र : कपिल पाटील यावेळी समाजवादी आतापर्यंत वेगवेगळ्या गट-तटांत विभागले गेले होते. पण आता हुकूमशाही संपविण्यासाठी, उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी सर्व समाजवादी जनता परिवार एकत्र आल्याचे कपिल पाटील म्हणाले. या बैठकीला खा. संजय राऊत, अनिल परब, शशांक राव, नितीन वैदय, डॉ. अभिजित वैद्य यांच्यासोबत सर्व २१ जनसंघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.