स्वत:ची चूक कबूल करत सुप्रीम कोर्टाने केली फाशी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 06:19 AM2018-11-25T06:19:26+5:302018-11-25T06:19:37+5:30

तीन वर्षांनी उपरती : मुंबईतील खुन्याला किमान २० वर्षे सक्तमजुरीसह जन्मठेप

Supreme Court convicts self-indulgence | स्वत:ची चूक कबूल करत सुप्रीम कोर्टाने केली फाशी रद्द

स्वत:ची चूक कबूल करत सुप्रीम कोर्टाने केली फाशी रद्द

googlenewsNext

मुंबई : बलात्कार व खुनाबद्दल फाशीची शिक्षा झालेल्या मुंबईतील एका आरोपीने त्याविरुद्ध केलेले अपील केवळ एका शब्दाच्या आदेशाने फेटाळण्यात आमची चूक झालीे, अशी कबुली देत सर्वोच्च न्यायालयाने या कैद्याला आता फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
मुंबईतील तीन डोंगरी, गोरेगाव (प.) येथील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या बाबासाहेब मारुती कांबळे या आरोपीच्या गळ््याभोवती आवळलेला फास यामुळे सुटला आहे. बाबासाहेब याचे वय आता साठीच्या घरात आहे. किमान २० वर्षांची सक्तमजुरी भोगल्याशिवाय त्याची मुदतपूर्व सुटका करता येणार नाही, असे बंधनही न्यायालयाने घातले.


फाशीच्या शिक्षेविरुद्ध बाबासाहेब यांने केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१५ मध्ये ‘डिसमिस्ड’ (फेटाळले) एवढा एकाच शब्दाचा आदेश देऊन फेटाळले होते. त्याविरुद्ध त्याने फेरविचार याचिका केली. न्या. ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण व न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत बाबासाहेब याच्यावतीने ज्येष्ठ वकील शेखर नाफडे यांनी एका शब्दाच्या आदेशाने फाशीविरुद्धचे अपील फेटाळणे कसे चुकीचे होते, हे न्यायाधीशांना पटवून दिले. नाफडे यांनी असा युक्तिवाद केला की, फाशी ही अपवादात्मक शिक्षा असल्याने ती कायम करतेवेळी न्यायालयाने त्याची काही तरी कारणमीमांसा नोंदविणे गरजेचे आहे.


अ‍ॅड. नाफडे यांचा युक्तिवाद मान्य करत खंडपीठाने अपील एका शब्दात फेटाळण्याचा आधीचा आदेश मागे घेत बबनराव याचे अपील पुनरुज्जीवित केले. त्यावर नवा निकाल देताना न्यायालयाने आरोपीस फाशीऐवजी जन्मठेप ठोठावली. बबनराव आता साठीला आला आहे व त्याच्यावर याखेरीज अन्य कोणताही गुन्हा नसल्याने तो सुधारण्यास वाव आहे, हे लक्षात घेऊन हा नवा आदेश दिला गेला.


न्या. सिक्री हे सर्वोच्च न्यायालयात सध्या सरन्यायाधीशांच्या खालोखाल सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. बबनराव याचे अपील आधी ज्या खंडपीठाने एका शब्दाच्या निकालाने फेटाळले होते त्यावर न्या. एच. एल. दत्तू व न्या. आर. के अगरवाल यांच्यासोबत न्या. सिक्रीही होते. न्या. सिक्री यांनी स्वत:च्या नेतृत्वाखालील खंडपीठाकरवी नवा निकाल देऊन चूक सुधारली.

Web Title: Supreme Court convicts self-indulgence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.