‘अॅट्रॉसिटीबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी’ - प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:42 PM2018-03-22T23:42:14+5:302018-03-22T23:42:27+5:30
अॅट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे अॅट्रॉसिटीचा कायदाच बोथट झाला आहे. या निर्णयाचा पुनर्विचार व्हायला हवा. यासाठी हा विषय व्यापक पीठाकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
मुंबई : अॅट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे अॅट्रॉसिटीचा कायदाच बोथट झाला आहे. या निर्णयाचा पुनर्विचार व्हायला हवा. यासाठी हा विषय व्यापक पीठाकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. या निर्णयामुळे दलितांवर अन्याय करणा-यांना अभय मिळणार आहे. कायद्याला वेसण घालण्यासारख्या गोष्टी न्यायसंस्थेने करू नये.
कोरेगाव-भीमा हिंसाचाराबाबत बोलताना ते म्हणाले की, एकबोटेला अटक झाली. पण, भिडेंना नाही, ही बाब समाजाच्या पचनी पडली नाही. भिडे यांना अटक करण्याची राजकीय इच्छाशक्ती सरकारमध्ये नाही. भिडे यांना अटक झाली नाही तर २६ मार्चला मुंबईत एल्गार मोर्चा काढला जाईल. हा कुठल्याही राजकीय पक्षांचा मोर्चा नाही. संभाजी भिडे यांना अटक केली तर सर्व वातावरण निवळून जाईल. हा मोर्चा निघणे किंवा न निघणे पूर्णपणे मुख्यमंत्र्याच्या हातात आहे. माझा मोर्चा अडवला तर त्यांना राज्यभर १४४ कलम लागू करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.