कामासाठी मुंबईत आलेल्या इस्थरची अत्याचार करुन हत्या;शिक्षेची वाट पाहणाऱ्याची कोर्टातून निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:16 IST2025-01-28T12:51:41+5:302025-01-28T13:16:48+5:30
इस्थर अन्हुया प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या चंद्रभान सानप याची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

कामासाठी मुंबईत आलेल्या इस्थरची अत्याचार करुन हत्या;शिक्षेची वाट पाहणाऱ्याची कोर्टातून निर्दोष मुक्तता
Esther Anuhya Case: इस्थर अन्हुया प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या चंद्रभान सानप याची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबईत २३ वर्षीय सॉफ्टवेयर इंजीनियर इस्थर अन्हुया हिच्यावर बलात्कार आणि हत्या केल्याच्या प्रकरणात चंद्रभान सानप याला विशेष महिला न्यायालयाने २०१५ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर त्याने आपल्या फाशीच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने अपील फेटाळल्यानंतर सानप याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तपासात त्रुटी आढळून आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने चंद्रभान सानप याची आज त्याची निर्दोष मुक्तता केली.
इस्थर अन्हुया या तरुणीचे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी चंद्रभान सानप याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सानपवर इस्थरचे अपहरण करणे, बलात्कार करणे, हत्या करणे आणि मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी विविध कलमांखाली आरोप लावण्यात आले होते. स्थानिक पोलिसांना तपासात अपयश आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस सानपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर सत्र न्यायालयाने चंद्रभान सानपला फाशीची शिक्षा सुनावली होती. मुंबई हायकोर्टानेही ही शिक्षा कायम ठेवली होती.
इस्थर अनुह्या हिच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी मृत्यूदंडाच्या शिक्षेची वाट पाहणाऱ्या चंद्रभान सानपची सुप्रीम कोर्टाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली. न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने चंद्रभान सुदाम सानप याची शिक्षा कायम ठेवणे अत्यंत असुरक्षित असल्याचा निर्णय दिला. पुरावे तपासल्यानंतर, कोर्टानं म्हटलं की, "आम्ही मानतो की अपीलकर्ता गुन्ह्यासाठी दोषी नाही. अपीलकर्त्याला मुक्त करण्यात यावे. तो दोषी नाही. तो निर्दोष आहे."
५ जानेवारी २०१४ रोजी टीसीएसमध्ये नोकरीसाठी इस्थर पहाटे पाचच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनसवर आली होती. मात्र तेव्हापासूनच ती बेपत्ता होती. १६ जानेवारी रोजी संध्याकाळी तिचा मृतदेह कांजूर पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील मिठागराजवळच्या तिवरांच्या झुडपांमध्ये आढळला. तिच्या मृतदेहावर पेस्ट कंट्रोलच्या कामासाठी वापरला जाणारा द्रव्य पदार्थ होता. तिच्या मृतदेहाजवळ तिची ओढणी आणि अंतर्वस्त्रे सापडली होती. इस्थर एकटी असल्याचे पाहून सानपने तिला पाहिलं आणि घरी सोडतो असं सांगितले. सानपने तिला बाईकवरुन ओसाड जागी नेले आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने विरोध केल्यामुळे सानपने तिची गळा दाबून हत्या केली.