सुप्रीम कोर्टाचे निकाल मराठीसह सात प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 06:05 AM2019-07-19T06:05:19+5:302019-07-19T06:29:23+5:30
सर्वोच्च न्यायालयाची निवडक निकालपत्रे मराठीसह सात प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्याची सोय गुरुवारपासून सुरू झाली.
- अजित गोगटे
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाची निवडक निकालपत्रे मराठीसह सात प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्याची सोय गुरुवारपासून सुरू झाली. न्यायालयाच्या वेबसाइटवर यासाठी ‘व्हर्नॅक्युलर जजमेंट्स’ असा स्वतंत्र शोधसंकेतक सुरू करण्यात आला आहे.
दिल्लीत पूर्वीच्या ‘चिडियाघर’च्या जागेवर उभारलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या विस्तारित इमारतीचे उद््घाटन बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. त्याच कार्यक्रमात भाषांतरित न्यायनिर्णयांच्या या नव्या सेवेचाही शुभारंभ झाला. ज्येष्ठ न्यायाधीश न्या. शरद बोबडे यांनी या वेळी प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरित केलेल्या निवडक निकालपत्रांच्या प्रती राष्ट्रपतींना सादर केल्या.
केरळ उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात राष्ट्रपतींनी केलेल्या सूचनेनुसारच ही भाषांतर सेवा सुरू केली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर गुरुवारी पहिल्या दिवशी हिंदी, तमिळ, कन्नड, तेलगू, बंगाली, आसामी व मराठीत भाषांतरित केलेली एकूण ११३ निकालपत्रे प्रसिद्ध केली गेली. त्यापैकी १४ मराठीत आहेत.
न्यायालयाची मूळ इंग्रजी निकालपत्रे निकाल झाल्यावर लगेच त्याच दिवशी वेबसाइटर टाकली जातात. दिले जाणारे प्रत्येक निकालपत्र इंग्रजीत उपलब्ध असते. भाषांतरित निकालपत्रांचे तसे नाही. ही निकालपत्रे समकालीन नाहीत. म्हणजे ज्या दिवशी निकाल होईल त्याच दिवशी भाषांतरित निकालपत्र मिळत नाही. सध्या उपलब्ध केलेली निकालपत्रे यंदाच्या जानेवारी ते मे या काळात दिली गेलेली आहेत. दुसरे असे की, ही निकालपत्रे निवडक आहेत.
प्रकरण ज्या राज्यातून आले असेल त्या राज्याच्या भाषेत ही भाषांतरे केली गेली आहेत. त्यामुळे भाषांतराची ही भाषा पक्षकाराची मातृभाषा असेलच असे नाही. उदा. मिरज येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण, बलात्कार व खून या प्रकरणात राजू जगदीश पासवान या आरोपीची फाशी रद्द करण्याचा निकाल प्रकरण केवळ महाराष्ट्रातील आहे म्हणून मराठीत भाषांतरित करण्यात आला आहे. तसेच पी. बंडोपाध्याय वि. भारत सरकार हे प्रकरण केवळ मुंबईतून गेले होते म्हणून मराठी भाषांतर केले गेले आहे. ही मराठी निकालपत्रे अनुक्रमे हिंदी व बंगाली मातृभाषा असलेल्या पासवान व बंदोपाध्याय यांना कशी कळणार हे अनाकलनीय आहे!
भाषांतराचे काम मुंबईतच
लोकाभिमुख अशी ही नवी सेवा सुरु केल्याचे श्रेय घेत सर्वोच्च न्यायालय वाहवा मिळवत असले तरी भाषांतराचे काम मुंबईतच केले गेले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या चीफ ट्रान्सलेटर व इंटरप्रिटर कार्यालयाकडून ही भाषांतरे करून घेण्यात आली आहेत. भाषांतरीत निकालपत्राच्या शेवटी व प्रत्येक पानावर व्ही. आर. घाणेकर, एम. डी. साने व आर. एन. लांजेकर या भाषांतरकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जमेची बाजू एवढीच की, एरवी पाहायला मिळणाºया अनाकलनीय व बोजड मराठीपेक्षा हे मराठी भाषांतर खूपच सुबोध व दर्जेदार आहे.
>फक्त अर्थ समजण्यापुरतेच
प्रत्येक भाषांतरित निकालपत्राच्या शेवटी तळटीप आहे, ती अशी : मराठी भाषेतील या अनुवादाचा वापर पक्षकारास त्याच्या मातृभाषेत त्याचा अर्थ समजून घेण्यापुरताच मर्यादित असेल. त्याचा इतर कोणत्याही कारणाकरता वापर करता येणार नाही. सर्व व्यावहारिक व कार्यालयीन वापराकरता मूळ इंग्रजी निकालपत्रच विश्वसनीय मानले जाईल.