मुंबई : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचे उल्लंघन करून, आरेच्या जागेत मेट्रो कारशेडचे काम बिनदिक्कतपणे सुरू असल्याचा आरोप करीत, वनशक्ती या पर्यावरणवादी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मेट्रोविरोधात नुकतीच त्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. हरित लवादाच्या आदेशाला न जुमानता मेट्रोने आरेत सुरू केलेले काम तत्काळ स्थगित करावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.वनशक्तीचे प्रकल्प संचालक डी. स्टॅलिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरित लवादाच्या आदेशात स्पष्ट म्हटलेले आहे की, कोणतेही काम आरेमध्ये करता येणार नाही. तरीही दररोज आरेमध्ये मेट्रो कारशेडसाठी जमिनीचे खोेदकाम सतत सुरू आहे. यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. स्थानिक आदिवासींनाही या कामाची झळ बसत आहे.आरेत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाविरोधात आरे पोलीस ठाण्यात मेट्रो प्रशासनाविरोधात पर्यावरणवादी संघटना रोज एक तक्रार नोंदवित आहेत. आत्तापर्यंत ८ पेक्षा जास्त तक्रारी दाखल झालेल्या आहेत. मात्र, पोलिसांनी आरेमध्ये सर्वेक्षण करण्यापलीकडे आतापर्यंत काहीही कारवाई केलेली नाही. त्यामुळेच सरकारी यंत्रणाही मेट्रो प्रशासनाला पाठीशी घालत असल्याचा संशय असून, या विरोधात आता आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.नुकतेच दिल्लीत जाऊन मेट्रो प्रशासनाच्या आरेत सुरू असलेल्या कामाविरोधात सर्वोच्च न्यायलयात अवमान याचिका दाखल केली आहे, अशी माहिती वनशक्तीचे प्रकल्प संचालक डी. स्टॅलिन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मेट्रोविरोधात वनशक्तीची सर्वोच्च न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 5:27 AM