Join us

सुप्रिया सुळेंनी पुन्हा मागितला फडणवीसांचा राजीनामा; म्हणे हा आणखी मोठा पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 3:12 PM

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतलं. पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला वेळ दिला आहे.

मुंबई - राज्यातील मराठा आंदोलनात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. काही राजकीय नेत्यांच्या घरांवरही आंदोलकांनी जाळपोळ केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हेही दाखल केले आहेत. दरम्यान, बीडमधील हिंसाचाराच्या घटनेचा उल्लेख करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला होता. आता, पुन्हा एकदा त्याच घटनेचा संदर्भ देत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांचा राजीनामा मागितला आहे. याप्रकरणी, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री महोदयांचे अपयश अधोरेखित होत असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतलं. पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला वेळ दिला आहे. मात्र, या दरम्यान घडलेल्या घटनांवरुन सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलं. तसेच, आमदार प्रकाश सोळंकी यांच्या घरावरील हल्ल्याचा संदर्भ देत त्यांच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामाही मागितला आहे. 

राज्य सरकारला पाठिंबा देणारे आमदार स्वतः सांगत आहेत त्यांच्या घरावर झालेला हल्ला पुर्वनियोजित होता. हल्लेखोरांकडे हत्यारे, पेट्रोलबॉम्ब, दगड आदी होते. या संपूर्ण घटनाक्रमात पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असेही त्यांचे म्हणणे आहे. ते गृहखाते आणि गृहमंत्री महोदयांचे अपयश अधोरेखित करीत आहेत, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जर या राज्यात सत्ताधारी आमदारांचीही घरे सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय हा प्रश्न आहे. राज्याचे गृहमंत्री सपशेल अपयशी ठरलेत आणि त्यांना गृहखाते झेपत नाही याचा हा आणखी मोठा पुरावा आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांना छत्तीसगडमध्ये प्रचारासाठी मोकळे करावे, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

यापूर्वीही केली होती मागणी

सत्तेतील आमदारांचाही सरकारवर विश्वास नाही. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. धनगर, मराठा, लिंगायत समाज बांधवांचा आक्रोश दिसून येत आहे. सरकारने सगळ्या समाजाला धोका दिला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. गृहमंत्री सातत्याने खोटं बोलतात, राज्यातील परिस्थितीला गृहमंत्रीच जबाबदार आहेत. आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर हल्ला झाला, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरी लहान लहान मुलं आहेत. त्यांच्या पत्नी फोनवर बोलतानाही थरथर कापत होत्या, असे म्हणत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी यापूर्वीही केली होती.  

टॅग्स :सुप्रिया सुळेदेवेंद्र फडणवीसगृह मंत्रालयमराठा आरक्षणबीड