मुंबई- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. सध्या मी आजारी असून, बऱ्याच घडामोडी होत आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. त्यांचा मोबाइल ‘स्विच्ड ऑफ’ असल्याने गूढ आणखीच वाढले आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका साखर कारखाना स्थळी असल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले.शरद पवार ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यावरून घडामोडी मुंबईत घडताना अजितदादा राजीनाम्याच्या तयारीत होते. त्यांच्या या हालचालींची शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या कोणासही कल्पना नव्हती. उलट मतदारसंघातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अजित पवार तिकडे गेलेले आहेत, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पत्रकारांना सांगण्यात येत होते. पवारांचा गड असलेल्या बारामतीचे अजित पवार हे पाचव्यांदा आमदार आहेत. त्या आधी ते एकदा खासदारदेखील होते. राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यात तेही एक आरोपी आहेत.
- कौटुंबिक वाद की पक्षात अवहेलना?
काका शरद पवार यांच्याशी मतभेद झाल्याने अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला की प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दिले जात असलेले महत्त्व त्यासाठी कारणीभूत ठरले की लोकसभा निवडणुकीत मुलगा पार्थच्या पराभवाची किनार या राजीनाम्याला आहे, या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
- राजीनामा नेमका केव्हा दिला?
शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना राजीनामा मेल केला. तसेच अध्यक्ष बागडे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून ‘‘आपल्याकडे मी राजीनामा दिलेला आहे, तो स्वीकारावा,’’ अशी विनंती केली. बागडे यांनी पत्रकारांना सांगितले की, योग्य फॉरमॅटमध्ये अजित पवार यांनी राजीनाम्याचे पत्र दिल्याने मी तो स्वीकारला आहे.