मुंबई - संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते, थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनेक नेत्यांकडून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रबोधनकारांचा उल्लेख के. सी ठाकरे करत नव्या वादाला तोंड फोडलं. सुप्रिया सुळे यांच्या या ट्विटवर मनसेने आक्षेप घेतला. त्यानंतर तातडीने हे ट्विट डिलीट करून नव्याने ट्विट करण्यात आले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, सत्यशोधक विचारांचा वसा घेऊन त्यासाठी आयुष्यभर लढा देणारे प्रबोधनकार के.सी ठाकरे यांची आज जयंती, यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन अशी पोस्ट केली. त्यात असलेल्या फोटोवर के. सी ठाकरे हे नाव ठळक अक्षरात दाखवण्यात आले तर प्रबोधनकार अगदी छोट्या शब्दात लिहिले होते. या ट्विटवरून वाद निर्माण होताच सुप्रिया सुळेंनी ते ट्विट डिलीट केले.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सुप्रिया सुळेंच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत ताई, तुम्ही एवढ्या मोठ्या झाला नाहीत असा टोला लगावला. देशपांडेंनी सांगितले की, प्रबोधनकार ठाकरेंना के.सी ठाकरे म्हणण्या एवढ्या मोठ्या ताई झाला नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सध्या या ट्विटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजकीय वर्तुळातूनही यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
मनसेकडून सुळेंच्या ट्विटवर आक्षेप घेतल्यानंतर तातडीने सुप्रिया सुळे यांनी ट्विट डिलीट केले. त्यानंतर नव्याने पोस्ट करत सुप्रिया सुळे यांनी जयंतीनिमित्त प्रबोधनकार ठाकरेंना अभिवादन केले. त्यात म्हटलं की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील खंबीर नेतृत्व, थोर समाजसुधारक, कणखर पत्रकार प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन असं लिहिलं होते.