Sharad Pawar ( Marathi News ) : देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. सर्वपक्षांकडून तयारीही सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटाकडून बारामती लोकसभा मतदार संघात उमेदवार देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दौरेही सुरू केले आहेत, त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार असणार अशी चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून अजित पवार यांनी बारामती पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी स्वत: शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत.
राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान, काँग्रेस, सपा'चे टेन्शन वाढले; मतमोजणी आजच होणार
बारामतील लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी संभाव्य लढत मानली जात आहे. या संदर्भात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आज खासदार शरद पवार मैदानात उतरले आहेत. बारामती लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकांच्या माध्यमातून ते आढावा घेणार असून पुढच्या सूचना देणार आहेत.
गेल्या काही दिवसापासूनच अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदार संघातील गावांना भेटी देत आहेत. यामुळे आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघात मोठी लढत होणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे या तीन टर्म खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी झाल्या होत्या. २०१९ च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा अजित पवार यांच्याकडे होती. तर आता अजित पवार या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात प्रचार करणार आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर समीकरणे बदलली
दरम्यान, आता राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर मतदार संघातील समीकरणे बदलली आहेत. सुप्रिया सुळेंच्या पराभवासाठी अजित पवार यांनी रणनीती आखली आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील ६ पैकी ४ मतदार संघात महायुतीचे आमदार आहेत. तर दोन आमदार हे काँग्रेसचे आहेत. यामुळे आता अजित पवार (Ajit Pawar) हे महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांचे पारडे जड दिसत आहे. एकीकडे अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी गाठीभेटी वाढवल्या आहेत, तर सुप्रिया सुळे, शरद पवार यांनीही गाठीभेटी वाढवल्या असून पदाधिकाऱ्यांसोबत बैठका सुरू आहेत.