मुंबई - ३०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी ललित पाटील याला कर्नाटकातून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. ललित पाटीलच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर, त्यांना तोंड बंद ठेवण्यासाठी धमक्या देण्यात येत आहेत. स्वत: सुषमा अंधारे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत भावनिक होऊन माहिती दिली. सुषमा अंधारेंच्या पाठिशी आता खासदार सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या आहेत. सुप्रिया सुळेंनी ट्विट करुन गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
ललितला अटकेनंतर मुंबईत आणण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाटील याने पुण्याच्या ससून रुग्णालयातून आपण पळालो नाही तर पळवले गेले. यामागे कोणाचा हात आहे, त्या सर्वांची नावे सांगणार, असा दावा केल्याने खळबळ उडाली. ललित पाटीलला अटक केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, सर्वांचे तोंड बंद होणार, दोषींवर योग्य कारवाई करु, असे म्हटले होते. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. तर, खासदार सुप्रिया सुळे यांनी सुषमा अंधारेंची पाठराखण करत फडणवीसांकडे मागणी केली आहे.
सुषमा अंधारे या ड्रग्जच्या विरोधात ठामपणे उभ्या आहेत. त्यांना धमक्या देण्यात येत आहेत. त्या ड्रग्जविरोधात लढू पाहत असताना सत्तेतील काही घटक त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. येथे महिलांना धमक्या देणाऱ्यांची गय केली जात नाही. स्वतः गृहमंत्र्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करायला पाहिजे. महिलांना धमक्या देणारे तातडीने गजाआड होणे गरजेचे आहे, अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे.
अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
तोंड बंद करणार म्हणजे काय करणार? संपवून टाकाल? नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना अडकवले तसे अडकवाल? देवेंद्र फडणवीस आपण एका पक्षाचे नेते नाही तर राज्याचे गृहमंत्री आहात. उडता महाराष्ट्र नाही झाला पाहिजे. जो कोणी ड्रग्जच्या विरोधात बोलेल त्यांनी शांत राहावे, अशी तुम्ही धमकी देत आहात. ललित पाटील नावाचा माणूस पळालो नाही तर मला पळवले, असे का म्हणतो याचा शोध घ्या, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.
राज्य शुल्क विभागाच्या मंत्र्यांचे अपयश
माझ्याकडील सर्व पुरावे माध्यमांसमोर ठेवले आहेत. राज्याच्या यंत्रणेवर आक्षेप असतील तर केंद्राच्या यंत्रणेणे तपास करावा, अशी मागणी केली आहे. दादा भुसे यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखवली त्यांचे स्वागत करते. पण शंभूराज देसाई एवढे का चिडले? राज्य शुल्क विभागाचे मंत्री म्हणून देसाई नापास झाले. ड्रग्जचा कारखाना उभा राहतो आणि तुम्हाला माहिती नाहीत तर तुमचे अपयश आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.