सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात देशातील सर्वात मोठं वन्यजीव अनाथालय अन् सफारी वर्ल्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 04:19 PM2020-08-27T16:19:46+5:302020-08-27T16:20:13+5:30
बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वे नं ९६, चांदणी चौक,वारजे येथे हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प तब्बल 130 एकर जागेवर साकारणार आहे. वन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सुप्रिया सुळेंनी येथे पाहणी दौरा केला
पुणे - जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात देशातील सर्वात मोठं वन्यजीव अनाथालय आणि सफारी वर्ल्ड साकारणार आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी यापूर्वीच या प्रकल्पाच्या उभारणीबद्दल माहिती दिली होती. सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातील वारजे येथे हे वन्यजीव अनाथालय साकारणार असून तब्बल 130 एकरात याचा विस्तार असणार आहे. या प्रकल्पाच्या जागेची सुप्रिया सुळेंनी आज पहाणी केली. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सुप्रिया यांनी याचे फोटो शेअर केले आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वे नं ९६, चांदणी चौक,वारजे येथे हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प तब्बल 130 एकर जागेवर साकारणार आहे. वन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सुप्रिया सुळेंनी येथे पाहणी दौरा केला. या प्रकल्पासाठी तब्बल 56.48 कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज आहे. या वन्यजीव अनाथालयात सर्वच जखमी वन्यप्राण्यांवर मोफत उपचार होणार असून त्यांची काळजीही घेतली जाईल. लोकसभेच्या बारामती तर विधानसभेच्या खडकवासला मतदारसंघात हा प्रकल्प उभा राहत आहे.
पुणे जिल्ह्यात भीमाशंकर सारखे मोठे अभयारण्य असून पुणे जिल्ह्यात शेकरू,बिबट्या,वानर,माकड,कोल्हा,लांडगा हरिण,काळवीट,आदी वन्य प्राणी अढळून येतात. तसेच शहरात व इतर परिसरात विविध वन्य पक्षी आढळून येतात. काही कारणास्तव हे वन्य प्राणी जखमी होतात. तसेच आजारी पडतात. त्यामुळे त्यांच्यावर योग्यवेळी उपचार करणे आवश्यक असते. मात्र, जिल्ह्यात केवळ कात्रज येथील प्राणी संग्रहालय या एकाच ठिकाणी प्राण्यांवर उपचार करणारी सक्षम यंत्रणा उपलब्ध आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा गट कार्यरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून या ठिकाणी जखमी वन्य प्राणी उपचारासाठी आणले जातात. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून कात्रज उद्यान चालवण्यासाठी लागणारा निधी कमी पडत आहेत.
प्राणीसंग्रहालयातील वन्य पक्षी व प्राण्याची संख्या आणि त्यांच्यावर होणारा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात संग्रहालयात वन विभागाकडून जखमी वन्य प्राणी उपचारासाठी दाखल केले जातात. रात्री दोन वाजता पाठविण्यात आलेल्या वन्य प्राण्यांवरही येथे उपचार केले जातात. त्यामुळे, वन विभागाने आता स्वत:चे वन्यजीव अनाथालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव 2018 मध्ये केंद्र शासनाकडे पाठविला होता. त्यास, मंजुरी मिळाल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी गेल्याच महिन्यात दिली होती. आता, या प्रकल्पाच्या जागेची पाहणीही त्यांनी केली.