मुंबई - शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वश्री हिचा २९ नोव्हेंबर रोजी विवाह पार पडला. मुलीच्या लग्नाच्या निमित्तानं आयोजित संगीत कार्यक्रमात संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत गाण्याच्या तालावर ठेका धरला. महाविकास आघाडीतील या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरुन अनेकांनी काहींनी टीकाही केली. या टीकेसंदर्भात आता खासदार सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीत संसंदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी हजर आहेत. तत्पूर्वी एक दिवस अगोदर मुंबईत खासदार संजय राऊत यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यातील संगीत कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती होती. मात्र, या सोहळ्यातील डान्समुळे त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. 'तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता, आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं. त्यामध्ये, बाहेरचं कुणीच नव्हतं. एखाद्या प्रायव्हेट फंक्शनमध्ये आम्ही काय करतो, त्यावरही कुणाला टीका करायची असेल तर काय बोलणार?,' असा प्रतिप्रश्न करत सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांच्यासमेवतच्या डान्सवरील टीकेला उत्तर दिलंय.
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे पुत्र मल्हार यांच्यासोबत राऊतकन्या पूर्वश्री लग्न बंधनात अडकली. लग्नाआधी संपन्न झालेल्या संगीत कार्यक्रमाला राज्यातील बडे नेते उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांचा डान्स लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरला. या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर, अनेकांनी सोशल मीडियातून कौतुक केलंय, तर काहींना टीकाही केली आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट टीका करत, दोन्ही नेत्यांना लक्ष्य केलंय.
राधाकृष्ण विखे पाटलांची टीका
राज्यात “एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करता, असे म्हणत विखेपाटील यांनी नेत्यांना सुनावले. तसेच, एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का?”, अशा शब्दात विखे पाटलांनी सुळे-राऊत यांच्या डान्स व्हिडिओवर खरमरीत टीका केली.