- विजय दर्डा
मुंबई : वसंत पंचमीचा दिवस हा देवी सरस्वतीच्या पूजनाचा आणि आराधनेचे पर्व मानला जातो. आजच्या या पवित्र दिनी ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा’ पार पडत आहे. एका अर्थाने देवी सरस्वतीचाच हा आशीर्वाद आहे. या पुरस्काराचे नाव माझी पत्नी ‘ज्योत्स्ना’शी जोडले गेले आहे. संगीतासोबत तिचे गहिरे नाते होते. खऱ्या अर्थाने त्या संगीत साधिका होत्या. आज ज्योत्स्ना आपल्यात नाहीत.
आजच्या प्रसंगी सांगायला हरकत नाही की, आजच्याच दिवशी आम्ही एक झालो होतो. आज आमच्या लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झाली. ती आज नसली तरी आपण सर्व इथे आहात. आपणा सर्वांमुळे, परिवारामुळे, मित्रांमुळे आज मी तुमच्या समोर (हसतखेळत) आहे.ज्योत्स्नाच्या रोमात संगीत होते. जीवन चांगल्या पद्धतीने जगायचे असेल तर संगीत हवे, अशी तीची धारणा होती. जीवनाच्या कठीण प्रसंगातही तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि प्रसन्नता कायम असायचे कारण त्या स्वत: संगीताशी जोडल्या गेल्या होत्या. त्यांचे संगीताप्रति असलेले अपार प्रेमच या पुरस्काराची प्रेरणा ठरली आहे.
या पुरस्कारांच्या माध्यमातून एक व्यासपीठ तयार करण्याचा आमचा मानस आहे. आज या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजन समिती आणि ‘लोकमत’ समूहाच्यावतीने मी आपणा सर्वांचे हृदयपूर्वक स्वागत करतो. आजच्या या सोहळ्यात संगीत क्षेत्रातील महारथींना आदरांजली अर्पण केली जाणार आहे. भारतीय संगीताला जगभरात नव्या उंचीवर नेणाऱ्या दिग्गजांचाही सन्मान होत आहे. तसेच उदयोन्मुख गायक-गायिका प्रथमेश लघाटे आणि हरगुन कौर यांचा २०२० चा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरव करीत आहोत.
या अवॉर्डच्या माध्यमातून भारतरत्न भीमसेन जोशी यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त आदरांजली अर्पण करीत आहोत. त्यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी उपस्थित आहेत. पद्मविभूषण जसराजजी यांनाही आदरांजली अर्पण करीत आहोत. त्यांच्या पुत्री दुर्गा जसराज आज इथे उपस्थित आहेत. सोबतच पद्मभूषण गुलाम मुस्तफा खान यांचेही स्मरण करीत आहोत. त्यांची मुले रब्बानी, मुर्तजा, कादिर आणि हसन खान या सोहळ्याला उपस्थित आहेत. या सर्व महनीय व्यक्तींनी भारतीय संगीताला एका नवीन उंचीवर नेण्यासाठी त्यांनी अमूल्य योगदान दिले. या महान कलाकारांना जाती, धर्माची बंधने नाहीत, त्यांची ती ओळखच नाही.
मानवता हाच त्यांचा धर्म आहे आणि मानवतेचे हे संगीत त्यांनी विश्चभर नेले. आजच्या या समारोहात संगीत जगतातील महनीयांचा सन्मान करणार आहोत. हा एका अर्थाने आमचा गौरवच आहे. यात कल्याणजी-आनंदजी जोडीच्या नावाने सुप्रसिद्ध असलेले पद्मश्री आनंदजी वीरजी शाह, पद्मश्री हरिहरन, पद्मश्री सतीश व्यास, पद्मश्री कैलाश खेर, पद्मश्री अनुराधा पौडवाल, पंडित अजय पोहनकर, रूपकुमार राठोड, सोनू निगम यांच्यासोबतच पद्मविभूषणाने सन्मानित उदित नारायण हे सर्व मान्यवर आज इथे उपस्थित आहेत. या महान कलाकारांचा गौरव या सोहळ्यात होणार आहे. या सर्व महानुभवांनी भारतीय संगीताला समृद्ध केले आहे. लोकांना अमृतानुभव दिला आहे.
आजच्या या सांगीतिक सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज आणि लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. ज्या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी उपस्थित असतात, त्या कार्यक्रमाला जनसामान्यांचा आशीर्वाद असतो. राज्याचे दोन दोन माजी मुख्यमंत्री तसेच मंत्री, आमदार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. याशिवाय जनतेसाठी अहोरात्र झटणारे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे आणि मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहलदेखील इथे उपस्थित आहेत.
‘सूर ज्योत्स्रा पुरस्कारां’च्या सात वर्षांच्या या प्रवासात दिल्ली, कोल्हापूर, पूणे, नागपूर अशा महानगरात या पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन केले होते. आगामी काळात देशातील इतर शहरांत याचा विस्तार करणार आहोत. या प्रसंगी परीक्षक मंडळाचे विशेष आभार मानायचे आहेत. देशभरातील हजारो टॅलेंटमधून एक महिला आणि एक पुरुष पुरस्कारांर्थ्यांची निवड करणे खरोखरच कठीण काम आहे. या वर्षीच्या परीक्षक मंडळात दिग्गजांचा समावेश होता. यात रूपकुमार आणि सोनाली राठोड, शास्त्रीय संगीत विशेषज्ञ शशी व्यास, टाइम्स म्युझिकच्या गौरी यादवडकर आणि सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा समावेश होता.
(सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यात लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमनआणि माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केलेले मनोगत)