'सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार' : शिव-भक्तीचे पल्लेदार भस्म - स्वर आणि मोहवणाऱ्या बासरीचे कोवळे मार्दव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 12:09 PM2023-03-21T12:09:25+5:302023-03-21T12:09:48+5:30

अभिलिप्सा पांडा-षड्ज गोडखिंडी यांचा 'सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा'ने सन्मान

'Sur Jyotsna National Music Award': Shiva-Bhakti's Palledar Bhasma - Young Mardav of Vocals and Enticing Flute | 'सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार' : शिव-भक्तीचे पल्लेदार भस्म - स्वर आणि मोहवणाऱ्या बासरीचे कोवळे मार्दव

'सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार' : शिव-भक्तीचे पल्लेदार भस्म - स्वर आणि मोहवणाऱ्या बासरीचे कोवळे मार्दव

googlenewsNext

हरहर शंभू, शंभू शिव ह महादेवा, शंभू अशी पल्लेदार हाळी देणारी आणि मुक्त केशसंभाराबरोबरच शिवशंभूच्या भक्तांना साजेसा पेहराव करून, कपाळी भस्माचे पट्टे लेवून रंगमंचावर अतीव आत्मविश्वासाने वावरत आपल्या विलक्षण वेगळ्या आवाजाने 'ट्रान्स' मध्ये घेऊन जाणारी तरतरीत गायिका अलीकडे भेटलीय का तुम्हाला यू-ट्यूबवर ?... ती अभिलिप्सा पांडा! आणि आपल्या बासरीच्या कोवळ्या मार्दवाने डोळे मिटून लडिवाळ वाटा-वळणांनी खोलवर कुठल्याशा मंद्र-मधुर प्रदेशात हलकेच घेऊन जाणारा षड्ज गोडखिंडी!

अगदी वेगळ्या स्वभावाच्या, वेगळ्या सांगीतिक प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या दोन तरुण कलाकारांना २०२२ सालचा 'सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार' देऊन गौरवण्यात येणार आहे. आजूबाजूच्या सांगीतिक गलबल्यातून अभिजात भारतीय संगीताची पताका पुढे घेऊन जाणारे अस्सल दमसासाचे सूर शोधणाऱ्या सूर ज्योत्स्ना या मंचावर अभिलिप्सा आणि षड्ज यांचा होणारा हा गौरव या दोघांच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा असेल, कारण या पुरस्काराने त्यांना मिळणारी तज्ज्ञ, दर्दी श्रेष्ठांची दाद!

आज, मंगळवारी (दि. २१) मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये रंगणाऱ्या संध्याकाळच्या देखण्या मैफलीत हे दोन तरुण, उमलते आश्वासक स्वर 
ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळवतील ! या विशेष मैफलीत ख्यातनाम बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. चतुरस्त्र प्रतिभेचे गायक शंकर महादेवन यांनाही 'आयकॉन' पुरस्काराने गौरविण्यात येईल.

चार वर्षाच्या कोवळ्या वयातच शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण सुरू करणारी ओडिशाची अभिलिप्सा तिच्या दादाजींचा सांगीतिक वारसा पुढे चालवते आहे. शिवशंकराच्या स्तुतिगानाने प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिलिप्सा सध्या तरुण श्रोत्यांमध्ये विलक्षण लोकप्रिय आहे. आजोबांच्या पिढीपासून कर्नाटकच्या गोडखिंडी घराण्यात वाहात आलेले बासरीचे मधुर स्वर लहानपणापासूनच कानावर पडलेला षड्ज या मधुरवाद्याकडे ओढला गेला नसता तरच नवल! शास्त्रीय आणि उपशास्त्रीय बाजाच्या मैफलींबरोबरच युगलवादन आणि जागतिक संगीतातील फ्यूजन अशा सगळ्या वाटा मोठ्या आत्मविश्वासाने चालणारा षड्ज भारतीय वाद्यसंगीताच्या क्षितिजावरील उगवता तारा आहे. 

पंडित हृदयनाथ मंगेशकर, पंडित विश्वमोहन भट, उस्ताद राशीद खान, रूपकुमार- सुनाली राठोड, शशी व्यास, गौरी यादवाडकर आणि लोकमत समूहाचे अध्यक्ष, माजी खासदार विजय दर्डा या तज्ज्ञ समितीने या विजेत्यांची निवड केली. लोकमत सखी मंचच्या संस्थापक स्वर्गीय श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित राष्ट्रीय संगीत पुरस्कारांचे हे दहावे वर्ष आहे.

नीलाद्री कुमार, सतार आणि झिटार
ख्यातनाम सतारवादक नीलाद्री कुमार आणि त्यांच्या फ्यूजन बॅण्डने सादर केलेला विशेष कार्यक्रम हे आजच्या मैफलीचे खास आकर्षण असेल. सतार आणि झिटार अशा सूत्रावर आधारलेले हे फ्यूजन एक वेगळाच अनुभव देऊन जाईल. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच आहे.

Web Title: 'Sur Jyotsna National Music Award': Shiva-Bhakti's Palledar Bhasma - Young Mardav of Vocals and Enticing Flute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.