......
मुंबईत उद्या रंगणार सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा
पं. हृदयनाथ मंगेशकर यांना सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार
यंदाचे विजेते - प्रथमेश लघाटे आणि हरगून कौर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा मंगळवारी सायंकाळी सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार आहे. या सोहळ्यात ख्यातनाम गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे; तसेच उद्योन्मुख गायक-गायिका प्रथमेश लघाटे आणि हरगून कौर यांचा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात. या पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी सहा वाजता सुरू होणाऱ्या देखण्या सोहळ्यात सूर, ताल आणि शब्द यांची अनोखी मैफल संगीत रसिकांना अनुभवता येणार आहे. संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभांच्या सन्मान सोहळ्याचे हे सातवे वर्ष आहे. देशभरातील संगीत प्रतिभांना शोधून त्यांना प्रोत्साहित करणे हा या पुरस्काराचा मूळ उद्देश आहे. गेल्या सहा वर्षांत या मंचाने अनेक कलावंतांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भावी वाटचालीकरिता प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे.
यंदाचे विजेते
सुमधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याने भारतीयांवर जादू करणारी हरगून कौर व लहान वयातच स्वत:च्या गायकीने वेगळी ओळख निर्माण करणारा प्रथमेश लघाटे हे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०२०चे विजेते ठरले आहेत.
सूरांची बरसात
पुरस्कार सोहळ्यात आर्या आंबेकर, पूजा गायतोंडे, अंकिता जोशी, एस आकाश, शंकर नाद कुरेशी, ओजस अढिया आणि रमाकांत गायकवाड या तरुण गायकांच्या सूरांची रसिकांवर बरसात होणार आहे.
आदरांजली
यंदा जन्मशताब्दी वर्ष साजरे होत असलेले पं. भीमसेन जोशी, तसेच नुकतेच दिवंगत झालेले पं. जसराज आणि गुलाम मुस्तफा खान यांना या सोहळ्यात आदरांजली वाहण्यात येणार आहे.
या मान्यवरांनी केली विजेत्यांची निवड
गायक रूपकुमार आणि सोनाली राठोड, शास्त्रीय संगीत तज्ज्ञ शशी व्यास, लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा आणि टाइम्स म्युझिकच्या गौरी यादवडकर या मान्यवरांनी सातव्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.
विशेष सन्मान
या सोहळ्यात आनंदजी वीरजी शाह, पं. अजय पोहनकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, हरिहरन, उदित राठोड, सतीश व्यास, रुपकुमार राठोड, कैलास खेर, सोनू निगम या संगीत क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
सोहळ्यास राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार प्रफुल्ल पटेल, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, इतर मागासवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, राठोड, प्रकाश जैन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विनामूल्य प्रवेशिकेसाठी संपर्क
या सोहळ्याचा प्रत्यक्ष आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. विनामूल्य पासेससाठी 8108469407 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करावा.
मास्कशिवाय प्रवेश नाही
कोरोनाचा काळ असल्याने सरकारने घालून दिलेल्या सर्व निर्बंधांचे पालन करत या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे अंतर नियमाचे पालन आणि मास्कचा वापर आवश्यक आहे. वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याने रसिकांनी नियोजित वेळेआधी सभागृहात पोहोचावे.