लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘लोकमत सखी’च्या संस्थापक आणि संगीत साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने संगीताच्या क्षेत्रातील असामान्य गुणवत्तेचा गौरव करणारा ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ वितरण सोहळा शुक्रवारी एनसीपीए येथे सायंकाळी ६:३० वाजता होणार आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि गायक नितीन मुकेश यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे. दरवर्षी या कार्यक्रमादरम्यान वैविध्यपूर्ण सांगीतिक आविष्कार सादर करण्यात येतात. सूफी जॅझ हे यावर्षीच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहे.
या पुरस्कार सोहळ्यादरम्यान सादर होणाऱ्या सूफी जॅझ कार्यक्रमात संगीतकार लुईस बँक, पूजा गायतोंडे, गीनो बँक्स, शेल्डन डिसिल्व्हा, हर्ष भावसार, जयंत गोशर आणि उन्मेष बॅनर्जी रसिक प्रेक्षकांना आपल्या सादरीकरणातून मंत्रमुग्ध करणार आहेत. संगीत हा ज्यांचा श्वास होता अशा स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ निर्मिलेले हे व्यासपीठ गायन, वादन क्षेत्रातील कलाकारांसाठी मैलाचा दगड ठरत आहे. पं. जसराज, पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. राजन-साजन मिश्रा, एल. सुब्रमण्यम, पं. हृदयनाथ मंगेशकर, शुभा मुद्गल, शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल, पंकज उधास आदी मान्यवरांना यापूर्वी या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सेलो पुरस्कृत व अदानी समूह आणि सॉलिटेअर समूह या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.
शब्दांच्या जादूगाराचा सन्मान
आपल्या शब्दांतून विविध भावनांना गीतबद्ध करणारे तसेच अनेक गाजलेल्या चित्रपटांचे पटकथालेखन करणारे जावेद अख्तर यांना या कार्यक्रमात लीजंड अवॉर्ड देऊन गौरविण्यात येणार आहे. गीत, गझल अशा विविध प्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. उर्दू आणि हिंदी भाषेचा अफलातून मिलाफ करत गीतांची रचना करणारे जावेद अख्तर या पुरस्कारानंतर उपस्थितांना संबोधित करणार आहे.
नितीन मुकेश यांना आयकॉन अवॉर्ड
हिंदी चित्रपटसृष्टीतील विख्यात गायक मुकेश यांचे पुत्र नितीन मुकेश यांना या कार्यक्रमादरम्यान आयकॉन अवॉर्ड देऊन गौरविण्यात येणार आहे. वडिलांकडून संगीताचा वारसा मिळूनही वडिलांच्या ग्लॅमरमधून बाहेर येत गायनाच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या नितीन मुकेश यांनी अनेक गाजलेल्या गाण्यांसाठी पार्श्वगायन केले आहे. संगीत क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अनमोल योगदानाबद्दल त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.