Join us

सूरज चव्हाणला ४ दिवसांची ED कोठडी; मुख्यमंत्री शिंदेंवर संतापले आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 7:02 PM

मुंबई महानगपालिकेमध्ये कोरोना काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांची चौकशी केली होती.

मुंबई- शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या सूरज चव्हाण यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली आहे. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांना अटक केली. त्यानंतर, न्यायालयात हजर केले असता न्यायलायाने सूरज चव्हाण यांना २२ जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ईडीची ही कारवाई आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबई महानगपालिकेमध्ये कोरोना काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांची चौकशी केली होती. सूरज चव्हाण यांनी अनेक कंत्राटदारांना चढ्या दराने कंत्राटं मिळवून दिल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. या कारवाईनंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन सूरज चव्हाण यांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे. 

लोकशाही संपवून आपल्या राज्यात मिंध्यांची टोळी हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जेवढी घाबरट आणि पोकळ राजवट, तेवढी जास्त त्यांची मस्ती आणि एजन्सीचा वापर... अशीच ही मिंधे राजवट... आदित्य यांनी म्हटले. तसेच, मिंधेंसारखा निर्लज्जपणे झुकले नाहीत, म्हणूनच सूरजला सतावले जात आहे. भाजप आणि मिंधेंमध्ये सामील झाले नाहीत, कारण ते देशभक्त आहेत. नाहीतर, प्रत्येक भ्रष्ट राजकारण्यांसारखेच मिंधे राजवटीत मंत्री झाले असते. स्वाभिमान, हिंमत, ताकद आणि स्वच्छ मन... सच्चा दिलाचा सूरज आहे. आम्ही सगळेच सत्यासाठी लढत राहू, असेही आदित्य यांनी ट्विट करुन म्हटले.  लोकशाही, सत्य, संविधान ह्यासाठी आमचा लढा आहे आणि आम्ही जिंकणारच!, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सूरज चव्हाण यांच्या अटकेनंतर ट्विट करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे.  

दरम्यान, सूरज चव्हाण यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केल्यानंतर न्यायालयाने चव्हाण यास २२ जानेवारीपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, या कारवाईचं मी स्वागत करतो, असं विधान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे. 

 

 

टॅग्स :शिवसेनाआदित्य ठाकरेमुंबईअंमलबजावणी संचालनालयगुन्हेगारीएकनाथ शिंदे